

मुंबई : सुरेखा चोपडे : येत्या शैक्षणित वर्षापासून (वर्ष २०२५) विद्यार्थ्यांना एसटीच्या एसी इ-बसमधून (AC electric bus) प्रवास करता येणार आहे. विद्यार्थ्यांना एसी इ-बसमधून प्रवास करण्याच्या प्रस्तावाला संचालक मंडळाने मंजुरी दिली असून हा प्रस्ताव आता राज्य सरकारच्या परवानगीसाठी पाठविण्यात आला आहे.
सध्या राज्यातील विद्यार्थ्यांना एसटीच्या साध्या बसने प्रवास करण्याची परवानगी आहे. महामंडळ इंधनावरील खर्च कमी करण्यासह पर्यावरण पुरक वाहतूकीसाठी ५ हजार १५० एसी इ-बस (AC electric bus) भाडेतत्वावर घेणार आहे. त्यापैकी १३८ मिडी बस सध्या ताफ्यात आल्या असून त्या राज्यातील ७ विभागातील विविध मार्गावर धावत आहेत. या महिन्याच्या शेवटी आणखी १०० बस महामंडळाच्या ताफ्यात दाखल होणार आहेत. ९ मीटर लांबीच्या ३२ आसनी २ हजार ३५० मिडी बस येत्या दोन वर्षात महामंडळाकडे येणार आहेत. या मिडी बस शक्यतो ग्रामीण भागात चालविण्यात येणार आहे. त्यामुळे या एसी-इ बसमधून (AC electric bus) विद्यार्थ्यांना प्रवास करण्याची मुभा देणारा प्रस्ताव महामंडळाने तयार केला होता.
राज्याच्या कानाकोपऱ्यातून सुमारे ९ ते १० लाख विद्यार्थी, विद्यार्थीनी दररोज शाळा-महाविद्यालयांमध्ये ये- जा करण्यासाठी एसटीने प्रवास करतात. विद्यार्थ्यांना राज्य सरकारतर्फे ६६.६६ टक्के तर विद्यार्थीनींना अहिल्याबाई होळकर योजनेंतर्गत पुर्ण १०० टक्के प्रवास सवलत दिली जाते. या निर्णयामुळे विद्यार्थ्यांना एकाच पासवर साध्या आणि एसी इ-बस मधून प्रवासी करता येणार आहे.
राज्यातील विद्यार्थ्यांना एसी इ-बस (AC electric bus) मधून प्रवासाची सुविधा देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या प्रस्तावाला राज्य सरकारची मंजुरी आवश्यक आहे. मंजुरीनंतर ही सुविधा प्रत्यक्षात सुरू होईल. नविन शैक्षणिक वर्षापासून विद्यार्थ्यांना ही सुविधा मिळेल.
- शिवाजी जगताप, महाव्यवस्थापक (वाहतूक), एसटी महामंडळ