

विक्रोळी : विक्रोळी च्या टागोर नगर भागात असलेल्या कमल वासुदेव वायकोळे शाळेत एका १३ वर्षीय विद्यार्थिनीचा शाळेच्या मुख्याध्यापकाने विनयभंग केल्याची घटना समोर आली होती. या प्रकरणी शुक्रवारी (दि.२०) अवधेश रामसागर पाठक (४४) या मुख्याध्यापकाला या पीडित मुलीच्या नातेवाईक आणि काही स्थानिकांनी मारहाण केली होती. या वेळी पोलिसांनी शाळेत पोहचून या मुख्याध्यापकाला ताब्यात घेऊन सदर मुलीच्या नातेवाईकांच्या तक्रारीवरून बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करून त्याला अटक केली होती.
मात्र शनिवारी (दि.२१) या मुख्याध्यापकांच्या समर्थनार्थ शाळेतील शिक्षक आणि विद्यार्थ्यानी शाळेपासून विक्रोळी पोलीस ठाणे पर्यंत मोर्चा काढला. ही कारवाई अन्यायकारक असून सदर मुख्याध्यापकांवरील गुन्हा मागे घ्यावा अशी मागणी शिक्षक आणि विद्यार्थ्यानी केली. यावेळी पोलीस ठाण्याला घेराव ही घालण्यात आला. या शिक्षकांची आणि विद्यार्थ्यांची समजूत काढून पोलिसांनी त्यांना परतवले.