

कोपरखैरणे : हिंदी-मराठी वाद आता शाळा महाविद्यालयांपर्यंत पोहचला आहे. वाशीतील एसआयईएस महाविद्यालयातील एका मराठी तरुणाला तो मराठी बोलतो असे म्हंटल्याने अमराठी तरुणांकडून मारहाण करण्यात आली आहे. यात तो गंभीर जखमी झाला आहे.
सूरज पवार (वय 20, राह. पावणे गाव, ऐरोली) असे मारहाण झालेल्या मराठी तरुणाचे नाव असून त्याने कॉलेजच्या व्हॉट्सअॅप ग्रुपमध्ये मी मराठी बोलता अशी पोस्ट केली होती. त्यामुळे त्याच्यावर इतर तीन अमराठी विद्यार्थ्यांनी हॉकी स्टिकने हल्ला केला. सोमवारी (21 जुलै) रोजी घडली आहे. पोलिसांनी जखमी तरुणाच्या तक्रारीवरून तीन जणांविरोधात गुन्हे दाखल केले आहेत.
सूरज पवार यानेे वाशी पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. यानुसार त्याने कॉलेजच्या व्हॉट्सअॅप ग्रुपमध्ये मी मराठी बोलतो असा संदेश पाठवला होता. यावर फैजान नाईक या विद्यार्थ्याने त्याची थट्टा करीत त्याला धमकीही दिली होती.
मात्र सुरजने याकडे दुर्लक्ष केले होते. दुसर्या दिवशी सुरुज सकाळी साडेदहाच्या सुमारास कॉलेजला पोहोचताच प्रवेशद्वारासमोरील फुटपाथवर फैजानने त्याला गाठले. हॉकी स्टिक मारहाण केली. त्याच्यासोबत असलेल्या दोघांनही सुरजला मारहाण केली. या हल्ल्यात तो रक्तबंबाळ झाल्याने त्याला रुग्णालयात दाखल केले. सध्या त्याची प्रकृती स्थीर आहे.
वाशी पोलिसांनी 20 वर्षीय फैजान नाईक आणि त्याच्या दोन साथीदारांविरोधात गुन्हे दाखल केले आहेत. आरोपींना पोलिसांनी नोटीस देऊन चौकशीसाठी बोलावले होते. आरोपी अमराठी मुलाने घडलेल्या प्रकाराबद्दल सर्वांसमोर मराठी मुलाची बिनशर्त माफी मागितली असल्याचे वाशी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय धुमाळ यांनी सांगितले.
या घटनेनंतर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने (मनसे) या हल्ल्याचा तीव्र शब्दात निषेध केला आहे. मनसेचे शहरप्रमुख गजानन काळे यांनी आरोपींची चौकशी करून त्यांच्यावर कायद्याची जरब बसेल अशी कारवाई करण्याची विनंती पोलिसांना केली आहे.