कुणाल कामरावर कठोर कायदेशीर कारवाई करू

मुख्यमंत्र्यांचा इशारा; सुपारीबाजांची अपमानास्पद विधाने सहन करणार नाही
 CM Devendra Fadnavis
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसPudhari Photo
Published on
Updated on

मुंबई : अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या नावाखाली आक्षेपार्ह आणि खालच्या पातळीवर जाऊन केलेला अपमान कोणत्याही परिस्थितीत सहन केला जाणार नाही. कॉमेडीच्या नावाखाली सुपार्‍या घेऊन अपमान करण्याचा प्रयत्न करणार्‍या कुणाल कामराविरोधात कठोर कायदेशीर कारवाई केली जाईल, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोमवारी विधानसभेत स्पष्ट केले.

कोणी कितीही दबाव आणला, तरी कामराला सोडणार नाही. प्रसिद्धीच्या हव्यासापोटी कोणाचाही अपमान करण्याचे प्रयत्न खपवून घेतले जाणार नाहीत, असा इशाराही मुख्यमंत्र्यांनी दिला. स्टँडअप कॉमेडियन कामरा याने आपल्या कार्यक्रमाद्वारे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर केलेल्या आक्षेपार्ह काव्याचे तीव्र पडसाद सोमवारी विधानसभेत उमटले. कामराविरोधात कायदेशीर कारवाईच्या मागणीसाठी सत्ताधारी आमदारांनी जोरदार घोषणाजी करत विधानसभेचे कामकाज रोखले. त्यामुळे सभागृहाचे कामकाज पाच मिनिटांसाठी तहकूब करावे लागले.

कामराला अटक करा :  खोतकर

शिवसेना आमदार अर्जुन खोतकर यांनी हा मुद्दा उपस्थित करत, कुणाल कामरा याच्या अटकेची मागणी केली. कामराने राज्यातील वातावरण दूषित केल्याने कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो. त्याला मिळणार्‍या पैशाचे स्रोत शोधा, त्याचे कॉल रेकॉर्ड तपासा, अशी मागणी त्यांनी केली. मंत्री शंभूराज देसाई यांनीही यापूर्वी कामराने पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि सरन्यायाधीशांनाही लक्ष्य केल्याचे सभागृहाच्या निदर्शनास आणून दिले.

विरोधकांनी छात्या बडवू नयेत

यावर, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कामरावर कठोर कारवाईचे आश्वासन दिले. संविधानाने प्रत्येकाला अभिव्यक्ती स्वातंत्र्य दिले असले, तरी यातून दुसर्‍याला अपमानित करण्याचा अधिकार कोणालाच नाही. अशा गोष्टी सहन करणार नाही. हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांचा वारसदार कोण, याचा कौल महाराष्ट्राच्या जनतेने 2024 च्या विधानसभा निकालाद्वारे दिला आहे. हा कुणाल कामरा महाराष्ट्राच्या जनतेपेक्षा मोठा आहे का, असा प्रश्न करत विरोधकांनीही यावरून छात्या बडविण्याचे उद्योग करू नयेत, अशा शब्दांत मुख्यमंत्र्यांनी विरोधकांना ठणकावले. कामरा याच्या आक्षेपार्ह टीकेनंतर लगेच विरोधकांचे ट्विट आले. काहींनी क्लिप टाकल्या. कामरासोबत ठरवून या गोष्टी केल्या जात आहेत. तुम्हीच त्याला सुपारी दिली काय, असा प्रश्न मुख्यमंत्र्यांनी केला. सुपार्‍या घेऊन बोलणार्‍या लोकांना धडा शिकवावाच लागतो, असेही त्यांनी नमूद केले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news