मुंबई : पुढारी वृत्तसेवा
मालवण येथील राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराजांचा पूर्णाकृती पुतळा कोसळल्यामुळे महायुती सरकारला मोठ्या संकटाला सामोरे जावे लागले असतानाच आता राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी रायगडावरील शिवरायांची समाधी लोकमान्य टिळकांनी शोधून काढल्याचे वक्तव्य केले आहे. त्यामुळे नव्याने वाद उद्भवला आहे. रायगडावरील महाराजांची समाधी महात्मा ज्योतिबा फुले यांनीच शोधून काढली हा इतिहास कोणी पुसून काढू शकत नाही, अशा शब्दांत त्यांना सरकारमधील मंत्र्यांसह विरोधकांनी त्यांना सुनावले आहे.
भागवत यांनी नुकतेच पुण्यातील एका कार्यक्रमात बोलताना छत्रपती शिवाजी महाराजांची रायगडावरील समाधी लोकमान्य टिळकांनी शोधून काढल्याचे वक्तव्य केले होते. त्यांच्या या विधानावरून विरोधकांनी त्यांच्यावर टीका सुरू केली आहे. महायुती सरकारमधील ज्येष्ठ मंत्री छगन भुजबळ यांनीही त्यांचा दावा खोडून काढला आहे. छत्रपती शिवाजी महाराजांची रायगडावरची समाधी महात्मा ज्योतिबा फुले यांनी शोधून काढली हा इतिहास कोणालाही बदलता येणार नाही. त्याचबरोबर शिवजयंती उत्सवदेखील ज्योतिबा फुले यांनीच सुरू केला आहे, असे भुजबळ म्हणाले.
विधासभेतील विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनीही भागवत यांच्या विधानावर संताप व्यक्त केला आहे.
१८६९ साली महात्मा फुले रायगडावर गेले होते. त्यावेळी त्यांनी महाराजांच्या समाधीचा शोध घेतला. समाधीला पुष्पहार अर्पण करून ते पुण्याला आले. त्यांनी महाराजांच्या जीवनावरील ९०८ ओळींचा पोवाडा लिहिला आणि या देशातील पहिली शिवजयंती उत्सवाला फुले यांनी सुरुवात केली. इतिहासाचा विपर्यास करू नये, खोटा इतिहास लोकांना सांगू नका, असे आवाहन इतिहासाचे अभ्यासक श्रीमंत कोकाटे यांनी केले.
भागवतांच्या विधानावरून शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनीही संताप व्यक्त केला आहे. ते म्हणाले, महात्मा ज्योतिबा फुले यांनी ही समाधी त्यांनी कष्टाने शोधून काढली. झाडाझुडपात लपलेली ही समाधी शोधताना तेथील मनुवाद्यांनी म. फुले यांना त्रासही दिला होता. मात्र, त्यांनी छत्रपती शिवरायांची समाधी व्यवस्थित करून घेतली. त्यामुळे आपण जे बोलता त्याला आम्ही इतिहासाचे विकृतीकरण म्हणतो.