

पुढारी ऑनलाईन डेस्क : बीड जिल्ह्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणी (Santosh Deshmukh murder case) महाराष्ट्र सरकारतर्फे ज्येष्ठ विधिज्ञ उज्ज्वल निकम (Ujjwal Nikam) यांची विशेष सरकारी वकील म्हणून, तर अॅड. बाळासाहेब कोल्हे यांची सहाय्यक विशेष सरकारी वकील म्हणून नियुक्ती करण्यात आल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे.
देशमुख हत्या प्रकरणी विशेष सरकारी वकील म्हणून नियुक्ती झाल्यानंतर उज्ज्वल निकम यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ''संतोष देशमुख हत्या प्रकरणात माझी नियुक्ती व्हावी यासाठी मस्साजोगच्या ग्रामस्थांनी आंदोलन सुरू केले होते. त्यानंतर मी मुख्यमंत्र्यांशी बोललो. मुख्यमंत्र्यांनी या संदर्भात आता माझी विशेष वकील म्हणून नियुक्ती केलेली आहे. आरोपपत्र दाखल झाल्यानंतर योग्य ती लढाई लढण्यात येईल,'' असे निकम यांनी म्हटले आहे.
मस्साजोगच्या ग्रामस्थांना माझी विनंती आहे की त्यांनी उपोषण मागे घ्यावे. कारण कायदा हा सर्वश्रेष्ठ असतो आणि कायद्यानुसार आपण न्याय मागितला पाहिजे, असेही आवाहन त्यांनी केले.
माझ्या नियुक्तीवरून विरोधक टीका करणार हे मी मुख्यमंत्र्यांना सांगितलं होते. पण मी जरी राजकारणात असलो तरी मी माझ्या कर्तव्यात कुठेही कसूर करणार नाही, अशी ग्वाही निकम यांनी दिली आहे.
केज तालुक्यातील मस्साजोग येथील सरपंच संतोष देशमुख यांची ९ डिंसेबर रोजी निर्घृण हत्या करण्यात आली होती. याप्रकरणी सुदर्शन घुले, सुधीर सांगळे, जयराम चाटे, महेश केदार, विष्णू चाटे, प्रतीक घुले आणि सिद्धार्थ सोनवणे यांना अटक करून त्यांच्यावर मोक्का अंतर्गत कारवाई करण्यात आली.
तसेच या हत्या आणि खंडणी प्रकरणाशी संबंधित असलेल्या वाल्मिक कराड यालाही खंडणीप्रकरणी अटक करण्यात आली. त्यांच्यावरही मोक्का अंतर्गत कारवाई करण्यात आली. या प्रकरणात उज्ज्वल निकम यांनी वकीलपत्र घ्यावे, अशी मागणी केली जात होती. हे वकीलपत्र घेण्यास ॲड. निकम यांनी तयारी दर्शवली होती. याआधी उज्ज्वल निकम यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेत चर्चा केली होती.
आवादा एनर्जी या पवनचक्की प्रकल्पात सुदर्शन घुले आणि त्याच्या साथीदाराने खंडणीसाठी तेथील सुरक्षा रक्षक आणि अधिकारी यांच्यासोबत झालेल्या भांडणातून मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांचा पाठलाग करून गाडी अडविली. त्यानंतर गाडीची काच फोडून त्यांचे ९ डिसेंबर रोजी अपहरण केले आणि त्यानंतर त्यांची हत्या केली होती.