State Election Commission EVM issue : राज्य निवडणूक आयोगाचे कुणी ईव्हीएम देता का ईव्हीएम?

इलेक्ट्रॉनिक कॉर्पोरेशनने नकार दिल्यास मध्य प्रदेशसह अन्य राज्यांना आयोगाची साद
State Election Commission EVM issue
EVMFile Photo
Published on
Updated on
मुंबई : मृणालिनी नानिवडेकर

राज्याच्या इतिहासात प्रथमच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका एकाच वेळी होण्याची शक्यता उद्भवल्यास मतयंत्रांची चणचण भेडसावणार आहे. केंद्र सरकारच्या अंतर्गत येणार्‍या इलेक्ट्रॉनिक कॉर्पोरेशनने 1 लाख मतयंत्रे तयार करून द्यावीत, अशी विनंती पत्राव्दारे राज्य निवडणूक आयोगाने केली आहे खरी, मात्र ऑक्टोबरपर्यंत नव्या यंत्रांचे उत्पादन होऊ शकणार नाही, अशी असमर्थता कंपनीने कळवली आहे.

केंद्रीय निवडणूक आयोग त्यांच्या साठ्यातील यंत्रे टॅम्परिंगच्या भीतीने देण्याची शक्यता नाही. तसे त्यांनी अनौपचारिकपणे कळवल्यानंतर आता आयोगाने लगतच्या राज्यातील मतयंत्रे वापरासाठी मागण्याच्या हालचाली सुरू केल्या आहेत. मध्य प्रदेशातून ही यंत्रे मागवावीत असा प्रस्ताव आहे. राज्याचे मुख्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे यांनी या संदर्भात मध्य प्रदेश तसेच अन्य राज्यांतील आयुक्तांशी संपर्क साधला आहे.

आज महाराष्ट्रात राज्य निवडणूक आयोगाकडे 65 हजार मतयंत्रे आहेत. निवडणूक रिंगणात उतरणार्‍या उमेदवारांची संख्या निश्चित झाल्यानंतर मतयंत्रे किती लागतील ते लक्षात येते.सामान्यत: एका मतयंत्रात 2 हजार मतदारांची मते नोंदवली जाऊ शकतात. ही मतसंख्या 1800 पर्यंत मर्यादित असणे आदर्श मानले जाते. महाराष्ट्रातील मतयंत्रांची संख्या लक्षात घेता निवडणुका एकत्र न होता त्या दोन टप्प्यांत घ्याव्यात, असा आयोगाचा विचार असल्याचे समजते.

महाराष्ट्रात लोकसभा निवडणुकीत 2 लाख 47 हजार मतयंत्रे वापरली गेली होती. प्रत्येक दोन मतयंत्रामागे साधारणत: एक कंट्रोल युनिट असते.या यंत्रातून ईव्हीएमचे संचालन होते. महाराष्ट्रात या वेळी स्थानिक स्वराज्य संस्थांत मतदानात चुरस असेल असे मानले जाते.त्यामुळे उमेदवार आणि मतदारांची संख्या जास्त असेल.

जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांसाठी 65 हजार कंट्रोल युनिट्स, तर दीड लाख मतयंत्रांची गरज असेल. राज्यात 29 महापालिका आहेत, त्यासाठी सुमारे 65 हजार कंट्रोल युनिट्स आणि 95 हजार मतयंत्रे लागतील असा अंदाज आहे. 248 नगरपालिकांसाठी 21 हजार मतयंत्रे, तर 14 हजार कंट्रोल युनिट्स लागतील. 42 नगरपरिषदांसाठी 850 कंट्रोल युनिट्स आणि 1260 बॅलेट यंत्रे लागतील. ही संख्या मोठी आहे.

केंद्रीय निवडणूक आयोग यंत्रे राज्याला देण्यास तयार नसल्याने या निवडणुका दोन टप्प्यांत घेणे अपरिहार्य ठरण्याची शक्यता आहे. एका टप्प्यात ग्रामीण भागातल्या निवडणुका झाल्यानंतर मते नोंदवली गेलेली चिप डेटा सुरक्षितपणे काढून पुन्हा वापरात येऊ शकेल.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news