

मुंबई, पुढारी वृत्तसेवा: एसटीच्या नव्या भाडेवाढीमुळे प्रवाशी व वाहक यांच्यात झालेल्या सुट्या पैशावरून दररोज बाचाबाची होत आहे. अमरावती जिल्ह्यातील दर्यापूर आगारातील नांदेड बुद्रुक या मार्गावर कामगिरी बजावणाऱ्या वाहकाला मारहाण झाल्याचा गुन्हा पोलिसात दाखल करण्यात आला आहे. भाडेवाढ झाल्यानंतर पाच दिवसांत अनेक ठिकाणी बाचाबाची झाल्याच्या घटना सोशल मीडियावर फिरत असून यातून पुढे काही अनर्थ घडू नये, यासाठी खबरदारी म्हणून भाडेवाढ सूत्रात तत्काळ बदल होण्यासाठी एसटीकडून पुन्हा एकदा राज्य परिवहन प्राधिकरणाकडे फेर प्रस्ताव सादर करण्यात यावा, अशी मागणी महाराष्ट्र एस.टी. कर्मचारी काँग्रेसचे सरचिटणीस श्रीरंग बरगे (Srirang Barge) यांनी केली आहे. (MSRTC News)
नवीन भाडेवाढ ही पाच रुपयांच्या पटीत असावी, असा स्पष्ट प्रस्ताव एसटीने या पूर्वीच पाठवला असताना त्याला प्राधिकरणातील अधिकाऱ्यांनी केराची टोपली दाखवली. व आर्थिक नुकसान होण्याचे तकलादू कारण देत अनपेक्षितपणे बदल करून एक रुपयाच्या पटीत भाडेवाढ करण्याचा आदेश काढला. सद्या चलनात सुट्या पैशाचे व्यवहार जवळ जवळ बंद झाले आहेत. एटीएममधून सुद्धा शंभर, दोनशे व पाचशे रुपयांच्या नोटा निघत असल्याने कोणताही प्रवाशी सुटे पैसे मागितल्यावर देत नाही. तरीही भाडेवाढ करताना प्राधिकरणाकडून एक रुपयाच्या पटीत भाडेवाढ केली गेली व एसटीला तोटा होण्याची भीती दाखवून अनपेक्षितपणे प्राधिकरणाकडून हा निर्णय लादला गेला असल्याची टीकाही बरगे यांनी केली आहे.
भाडेवाढीवर निर्णय घेण्याचे अधिकार राज्य परिवहन प्राधिकरणाला आहेत. १६ जून २०१८ रोजी व २६ ऑक्टोबर २०२१ रोजी जी भाडेवाढ करण्यात आली आहे. ती पाचच्या पटीत करण्यात आली होती. त्याच सूत्रानुसार भाडेवाढ पाचच्या पटीत करण्यासाठी प्राधिकरणातील अधिकाऱ्यांना सांगायला हवे. सुट्या पैशांची अडचण येत असल्याचे पुरावे देऊन त्याच प्रमाणे वाहकांकडून आलेल्या तक्रारी व पोलिसांत दाखल झालेले गुन्हे याचे पुरावे सादर करून पुन्हा एकदा प्रस्ताव एसटीकडून पाठवला जावा, असेही बरगे यांनी म्हटले आहे.