

मुंबई: महाराष्ट्राचे आराध्य दैवत गणेशाचे आगमन बुधवारी होत असून हा उत्सव निर्विघ्न पार पडावा यासाठी सर्व सुरक्षा यंत्रणा सज्ज असून मुंबई पोलिसांनी कडेकोट बंदोबस्त तैनात केला आहे. सहा पोलीस उपायुक्तांसह 51 सहाय्यक पोलीस आयुक्त, 2,637 पोलीस अधिकारी आणि 14 हजार 430 पोलीस कर्मचार्यांसह एसआरपीएफ, क्यूआरटी पथक, दंगल नियंत्रण पथक, वाहतूक पोलीस, डेल्टा, कॉम्बॅट, होमगार्ड तैनात करण्यात आले आहेत.
संभाव्य घातपाताच्या
पार्श्वभूमीच सर्वच पोलीस ठाण्यांना सतर्कचा इशारा देण्यात आला आहे. संशयितांची कसून चौकशीचे आदेश देण्यात आले आहे. तर कायदा व सुव्यवस्थेला कुठेही बाधा येणार नाही याची मुंबईकरांनी काळजी घ्यावी तसेच सहकार्य करावे असे आवाहनही मुंबईकरांना करण्यात आले आहे.
मुंबई पोलिसांनी गणेशोत्सव जल्लोषात साजरा करताना शांतता आणि सतर्क राहण्याचे आवाहन सर्वच गणेश मंडळाना केले आहे. या काळात मुंबई पोलिसांनी शहरात जास्तीत जास्त पोलिसांचा बंदोबस्त तैनात केला आहे. मुंबई पोलिसांच्या मदतीला अतिरिक्त आरपीएफ प्लाटून, एसआरपीएफ प्लाटून, जलद प्रतिसाद पथक, दंगल नियंत्रण पथक, डेल्टा, कॉम्बॅक्ट, होमगार्डसह वाहतूक पोलीस, बीडीडीएस, परिमंडळीय पोलीस अधिकारी, अंमलदार आदींच्या मदतीने बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
पोलीस आयुक्त देवेन भारती, सहपोलीस आयुक्त सत्यनारायण चौधरी यांच्यासह इतर सहपोलीस आयुक्त, अतिरिक्त पोलीस आयुक्त, 36 पोलीस उपायुक्तांसह 51 सहाय्यक पोलीस आयुक्त, 2637 पोलीस अधिकारी आणि 14 हजार 430 पोलीस कर्मचार्यांना बंदोबस्ताकामी तैनात करण्यात आले आहे. या कालावधीत सर्व पोलिसांच्या सुट्या रद्द करण्यात आल्या आहेत.
सुरक्षा उपाययोजना
शहरात पाच ते सहा हजारांहून अधिक सीसीटिव्हींची नजर राहणार आहे.
गणपती मंडळाच्या ठिकाणी पुरेशा प्रमाणात बंदोबस्त असेल.
स्थानिक पोलिसांसह एटीएस तसेच जलद प्रतिसाद पथकाला (क्यूआरटी) सतर्क राहण्याचे आदेश.
अधिकाअधिक नाकाबंदी आणि कोम्बिंग ऑपरेशनवर भर दिला जाणार आहे.
रेल्वे स्थानक, विमानतळ आणि शासकीय-निमशासकीय इमारत, विधानभवन, मंत्रालय आदी ठिकाणी बंदोबस्त असेल.
रेल्वे पोलिसही सतर्क
मध्य आणि पश्चिम रेल्वेच्या दादर ते भायखळा तसेच लोअर परेल, प्रभादेवी, ग्रँटरोड, चर्नीरोड स्थानिक अतिरिक्त रेल्वे पोलीस बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे. लोकल प्रवासात हुज्जडवाडी , स्टंट करणार्यांवर रेल्वे पोलिसांची नजर असणार आहे.
गर्दीवर विशेष लक्ष
गिरगाव, लालबाग, परळ, मलबार हिल, दादर, भायखळा, मरिनड्राईव्ह, खेतवाडी आदी ठिकाणी काही आक्षेपार्ह किंवा बेवारस वस्तू दिसल्यास हात लावू नये. त्याची माहिती जवळच्या पोलीस ठाण्यांना द्यावी. तसेच गर्दीचा फायदा घेऊन छेडछाडीचे प्रकार घडू नये म्हणून पोलिसांनी विशेष काळजी घेतली आहे.