मुंबई : संत आणि पत्रकारांकडून प्रशंसा मिळणे एवढे सोपे नसते. विशेषतः ज्यांच्या हाती कारभार आहे त्यांना कधी फुले मिळतात आणि दगडही. या दोन्ही बाबी कशा घ्यायचे हे त्यांच्या व्यक्तित्वावर असते. आजचे पुरस्कार्थी असलेले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे या दोन्ही गोष्टींकडे सकारात्मकतेने पाहतात. पदावर असोत किंवा नसो, त्यांचे कार्य अनुकरणीय राहिले आहे. ते देवाभाऊ तर आहेतच,शिवाय देशभाऊही आहेत, अशा शब्दांत आध्यात्मिक गुरू श्री श्री रविशंकर यांनी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे कौतुक केले.
मराठी पत्रकार संघाचा फिनिक्स विशेष सन्मान या पुरस्काराने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सन्मानित करण्यात आले. श्री श्री रविशंकर यांच्या हस्ते मुख्यमंत्री फडणवीस यांचा सत्कार करण्यात आला. याप्रसंगी श्री श्री रविशंकर यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांच्या गुणांचे विशेष कौतुक केले.
संत आणि पत्रकारांकडून प्रशंसा मिळणे हे एवढे सोपे नाही, पण आपण ते कसे घ्यायचे हे व्यक्तीवर आधारित आहे. आज मुख्यमंत्री फडणवीस यांना आपण सन्मानित केले ते या दोन्ही गोष्टी सकारात्मकतेने घेतात. पदावर असोत अथवा नसोत, त्यांचे व्यक्तित्व आणि कार्य हे अनुकरणीय आहे, असे श्री श्री रविशंकर म्हणाले.
एखाद्या पदावर राहून प्रसन्न राहणे, हीच एक विशेष बाब असून फडणवीसांनी ते मिळवल्याचे रविशंकर म्हणाले. राजकारण किंवा नेता असणे हे सोपे काम नाही. आपल्या देशात गावागावांत लोक राजकारण्यांना पाहात असतात. त्यांचे मूल्यमापन करत असतात. एखाद्याला सन्मान हा पदामुळे, प्रतिभा, कार्य किंवा व्यक्तिमत्त्वामुळे मिळत असतो.
पद असो किंवा नसो, देवेंद्र फडणवीस कार्यरत असतात हेच त्यांचे अनुकरणीय गुण दर्शवितात. सहनशीलता, सर्वांना सोबत घेऊन जाण्याची कला आणि विशाल दृष्टिकोन साधला आहे. सर्वांना स्नेहाने सोबत घेणे आणि एक स्वप्न देण्याचे काम देवेंद्र फडणवीस यांनी केले आहे. महाराष्ट्राला एक ट्रिलियन डॉलरची अर्थव्यवस्था बनविण्याचे स्वप्न त्यांनी पाहिले आहे. असेच स्वप्न जर देशातील प्रत्येक राज्याने पाहिल्यास देश पुढे जाईल, असे रविशंकर म्हणाले.