Shinde vs Thackeray | ठाकरे गटाचे ६ खासदार शिंदेंना भेटले; एकाला मंत्रिपदाची ऑफर

उद्धव ठाकरे गटाच्या ७ खासदारांशी गुप्त बैठक; पुन्हा ‘ऑपरेशन टायगर’ला वेग : अमित शहांशी गुफ्‍तगू
 Shinde vs Thackeray |
Shinde vs Thackeray | ठाकरे गटाचे ६ खासदार शिंदेंना भेटले; एकाला मंत्रिपदाची ऑफरFile Photo
Published on
Updated on

नरेश कदम

मुंबई : उद्धव ठाकरे गटाचे सात खासदार फुटीच्या उंबरठ्यावर असून या खासदारांसोबत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची दिल्लीत ७ जूनला रविवारी दिल्लीत गुप्त बैठक झाली आहे. केंद्रीय मंत्रिमंडळ विस्ताराच्या पार्श्वभूमीवर ठाकरे गट फोडण्याच्या हालचाली सुरू असून या गटातील एका खासदाराला मोदी मंत्रिमंडळात मंत्रिपद देण्यात येणार असून अन्य खासदारांचा मानदेखील संभाळण्यात येईल, असे आश्वासन शिंदे यांनी दिले असल्याचे सूत्रांनी सांगितले.

उपमुख्यमंत्री शिंदे आणि खासदार श्रीकांत शिंदे हे गेल्या सहा महिन्यांपासून उद्धव ठाकरे गटाच्या खासदारांशी संपर्क साधून आहेत. श्रीकांत शिंदे यांनी, यापूर्वी दिल्लीत ठाकरे गटाच्या खासदारांच्या स्वतंत्र भेटी घेतल्या होत्या आणि त्यांचे मन वळविले होते. त्यानंतर या खासदारांची एकत्र बैठकीही झाल्या. शिंदे गटाचे केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव यांच्या दिल्लीतील बंगल्यावर ठाकरे गटाच्या खासदारांच्या बैठका झाल्या आहेत. परंतु मध्यंतरी भाजपकडून तूर्तास ठाकरे गटात फोडाफोडी नको, असे सांगण्यात आले होते.

पण रविवारी ७ जूनला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे दिल्लीला रवाना झाले. त्यांनी दिल्लीत ठाकरे गटाच्या खासदारांची गुप्त बैठक घेतली. आणि सर्व रणनीती आखली गेली आहे. सात खासदारांपैकी एका खासदाराला मंत्रिपद देण्यात येणार असून मराठवाड्यातील एका खासदाराच्या नावाची चर्चा आहे. अन्य खासदारांना काही महत्त्वाची पदे देण्यात येणार आहेत. ठाकरे गटाचे नऊ खासदार असून मुंबईतील दोन खासदार वगळून अन्य सात खासदार फुटीच्या उंबरठ्यावर आहेत.

उपमुख्यमंत्री शिंदे हे ७ आणि ८ जूनला दिल्लीत होते. ठाकरे गटाच्या खासदारांच्या भेटीनंतर त्यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतल्याचे समजते. त्यात ठाकरे गटाचे खासदार फोडीबाबत चर्चा झाली आहे. केंद्रीय मंत्रिमंडळ विस्तार झाला तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे चिरंजीव श्रीकांत शिंदे यांची वर्णी लागेल, अशी चर्चा शिंदे गटात आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news