MLC election Maharashtra : विधान परिषदेच्या ६ जागा बिनविरोध

स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघात महायुतीची आघाडी
MLC
MLC Pudhari Photo
Published on
Updated on

मुंबई : महाराष्ट्राच्या विधान परिषदेच्या स्थानिक स्वराज संस्था मतदारसंघाच्या १७ जागांपैकी ६ जागा गुरुवारी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी बिनविरोध झाल्या. यात दोन शिवसेना, दोन राष्ट्रवादी काँग्रेस आणि दोन जागांवर भाजपने बिनविरोध विजय मिळवला. त्यामुळे आता ११ जागांसाठी निवडणूक होईल.

सत्ताधारी महायुतीच्या उमेदवारांसमोर महाविकास आघाडीने आव्हान उभे करण्याचा प्रयत्न केला. मात्र, मविआच्या काही उमेदवारांनी संख्याबळाचे तसेच मित्रपक्षांचे सहकार्य मिळत नसल्याचा आरोप करत माघार घेतली, तर महायुतीच्या नेत्यांना देखील बंडखोरांना शांत करण्यात यश आले.

MLC
Maharashtra Politics: पुण्यात निष्ठावंतांना डावलल्याने राष्ट्रवादीत नाराजी

रायगड-रत्नागिरी-सिंधुदुर्ग : या जागेवर राष्ट्रवादी काँग्रेसचे अनिकेत तटकरे बिनविरोध झाले. ठाकरेंच्या शिवसेनेकडून बाळ माने यांना उमेदवारी देण्यात आली होती. मात्र, बाळ माने मंत्री नितेश राणे यांच्यासोबत जिल्हाधिकारी कार्यालयात आले आणि त्यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतला. शेकापच्या अरविंद म्हात्रे यांच्याकडून अर्ज मागे घेण्यात आला. दरम्यान, पक्षविरोधी कारवाईमुळे बाळ मानेंची ठाकरेंच्या सेनेतून हकालपट्टी केल्याचे संजय राऊत यांनी जाहीर केले.

MLC
Maharashtra Politics: शिवसेना नरमली, पण भाजपचे बंडखोर अजूनही मैदानातच! एकनाथ शिंदे स्वतः ‌‘ॲक्टिव्ह मोड‌’मध्ये

पुणे : पुणे स्थानिक स्वराज संस्था मतदारसंघातून राष्ट्रवादीचे सुनील टिंगरे, भाजपचे बंडखोर उमेदवार प्रदीप कंद यांनी माघार घेतली, तर महाविकास आघाडीतील राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे श्रीकांत पाटील यांनी माघार घेतल्याने पुण्यात राष्ट्रवादीचे विक्रम काकडे बिनविरोध विजयी झाले.

अहिल्यानगर : अहिल्यानगरमध्ये काँग्रेसच्या पाठिंब्यावर करण ससाणे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला होता, तो त्यांनी मागे घेतला. प्राजक्त तनपुरे यांच्या विरोधात अपक्ष उमेदवार दत्तात्रय पानसरे यांचा उमेदवारी अर्ज बाकी होता तो त्यांनी उशिरा मागे घेतला.

ठाणेः ठाण्यात एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे रवींद्र फाटक बिनविरोध झाले. त्यांच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाकडून अभिजीत पवार रिंगणात होते. मात्र, त्यांनी माघार घेतली.

नाशिक : नाशिक स्थानिक स्वराज संस्था मतदारसंघात एकनाथ शिंदेंच्या शिव-सेनेचे नरेंद्र दराडे उमेदवार आहेत. भाजपच्या गणेश गीते यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतला. मात्र, गोकुळ गीते यांनी अर्ज कायम ठेवला. यामुळे या ठिकाणी नरेंद्र दराडे विरुद्ध गोकुळ गीते अशी लढत होईल.

यवतमाळ : यवतमाळ स्थानिक स्वराज संस्था मतदारसंघासाठी काँग्रेसने उमेदवारी दिलेल्या साहेबराव कांबळे यांनी काल माघार घेतली. त्यामुळे मविआकडून सय्यद फारूख यांना पाठिंबा देण्याबाबत विचार सुरू होता. मात्र, सय्यद फारुख यांनी गुरुवारी अर्ज मागे घेतला. या मतदारसंघातून दुष्यंत चतुर्वेदी बिनविरोध विजयी झाले.

सांगली-सातारा : शिवसेनेच्या तानाजीराव पाटील यांनी एकनाथ शिंदे यांच्या आदेशाने शंभुराज देसाई यांच्या उपस्थितीत उमेदवारी अर्ज मागे घेतला. या ठिकाणी धैर्यशील कदम आणि अभयसिंह जगताप अशी लढत होईल.

नागपूर : नागपूरमध्ये काँग्रेसचे उमेदवार दिनेश ढोले, शेकापचे अपक्ष उमेदवार सुरेंद्र लोही, राजेंद्र जंगले यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतल्याने या ठिकाणी अतुल लोंढे यांच्या विरोधात महायुतीचे डॉ. राजीव पोतदार असतील.

राज्यातील ११ मतदारसंघांतील प्रमुख लढती, आमन-सामने कोण ?

  • सोलापूर : राजेंद्र राऊत (भाजप) विरुद्ध वसंतराव देशमुख (राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार)

  • जळगाव : नंदकिशोर महाजन (भाजप) विरुद्ध शरद तायडे (ठाकरेंची शिवसेना) विरुद्ध रेश्मा काळे (शिंदेंची शिवसेना बंडखोर)

  • सांगली-सातारा : धैर्यशील कदम (भाजप) विरुद्ध अभयसिंह जगताप (राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार) विरुद्ध किशोर धुमाळ (अपक्ष)

  • नांदेड : अमर राजूरकर (भाजप) विरुद्ध रामदास पाटील (काँग्रेस)

  • भंडारा-गोंदिया : नरेश ईश्वरकर (काँग्रेस पाठिंबा) विरुद्ध अविनाश ब्राह्मणकर (भाजप)

  • नाशिक : गोकुळ गीते (अपक्ष) विरुद्ध नरेंद्र दराडे (शिवसेना)

  • अमरावती : हर्षदीप देशमुख (काँग्रेस) विरुद्ध प्रवीण पोटे (भाजप) विरुद्ध निलेश विश्वकर्मा (वंचित )

  • धाराशिव-लातूर-बीड : बसवराज पाटील (भाजप) विरुद्ध महेश देशमुख (काँग्रेस)

  • परभणी-हिंगोली : सईद खान (शिवसेना) विरुद्ध डॉ. विवेक नावंदर (ठाकरेंची शिवसेना) विरुद्ध सुशील देशमुख (अपक्ष)

  • छत्रपती संभाजीनगर-जालना : सुहास शिरसाट (भाजप) विरुद्ध गणेश लोखंडे (ठाकरेंची शिवसेना)

  • नागपूर (पोटनिवडणूक) : डॉ. राजीव पोतदार (भाजप) विरुद्ध अतुल लोंढे (काँग्रेस)

बिनविरोध विजयी उमेदवार

  • वर्धा-गडचिरोली-चंद्रपूर : अरुण लखाणी, भाजप

  • पुणे: विक्रम काकडे, राष्ट्रवादी काँग्रेस

  • ठाणे : रवींद्र फाटक, शिव-सेना

  • रायगड-रत्नागिरी-सिंधुदुर्ग : अनिकेत तटकरे, राष्ट्रवादी काँग्रेस

  • अहिल्यानगर : प्राजक्त तनपुरे, भाजप

  • यवतमाळ : दुष्यंत चतुर्वेदी, शिवसेना

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news