

मुंबई: पुढारी वृत्तसेवा : येत्या काही दिवसांत जे.जे. रुग्णालयातील कामगारांच्या रिक्त जागा सरळसेवा भरती प्रक्रियेने भराव्यात. अन्यथा प्रशासनाच्या वेळकाढू धोरणाविरोधात पूर्वी स्थगित केलेले 'काम बंद असहकार आंदोलन' ३ जुलैपासून सुरू केले जाईल, असा इशारा जे जे रुग्णालय कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष कृष्णा रेणोसे यांनी आज (दि.२) दिला आहॆ.
रुग्णालयातील रिक्त पदे सरळसेवेने तातडीने भरावीत.
न्यायालयीन बदली कर्मचाऱ्यांना सेवेत कायम करावे.
कर्मचाऱ्याला मारहाण प्रकरणात दोषीवर कडक कारवाई करावी.
दि १५/२/२०१६ रोजीच्या शासन निर्णयातील शासन सेवेत नियमित केलेल्या १९८१ पासून रुग्णसेवा देणाऱ्या बदली कामगारांना जुनी पेन्शन योजना (१९८२) न्यायालयीन निर्णयाप्रमाणे लागू करावी.
मुंबई शहरात सर जे जे रुग्णालयात येणाऱ्या रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहॆ. मात्र, मागील दहा वर्षापासून असलेल्या रिक्त पदे भरलेली नाहीत. त्यातूनही कार्यरत असलेले कर्मचारी नियत वयोमानानुसार निवृत्त होण्याचे प्रमाणही अधिक आहॆ. त्यामुळे मोठ्या प्रमाणात जागा रिक्त झालेल्या आहेत. १ हजार ३५२ मंजूर खाटांच्या रुग्णालयात पुरेशा कर्मचाऱ्यांअभावी पुरेशी रुग्णसेवा देणे अशक्य झाले आहे. कर्मचाऱ्यांना स्वतःच्या कामासाठी सुट्ट्या देखील घेता येत नाहीत. या सर्व बाबींचा कर्मचाऱ्यांच्या मानसिक, शारीरिक आरोग्यावर परिणाम होण्याची शक्यता आहे. मात्र, प्रशासन भरतीबाबत वेळ काढू धोरण राबवित आहे, ही खेदाची बाब आहॆ.