

वेंगुर्ले : Tourism Projects in Maharashtra | विधानसभा निवडणुकीत महायुतीला मिळालेल्या घवघवीत यशानंतर केंद्रातील भाजप सरकारने महाराष्ट्राला घवघवीत निधीचे गिफ्ट दिले आहे. पर्यटन क्षेत्राला चालना देण्यासाठी विशेष साहाय्य योजनेंतर्गत सिंधुदुर्गमध्ये अंडर वॉटर म्युझियम, आर्टिफिशियल रिफ आणि पाणबुडी पर्यटनासाठी ४६ कोटी ९१ लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे; तर नाशिक येथील आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर गोदाघाट परिसरात 'राम काल पथ' उभारण्यासाठी ९९ कोटी १४ लाख रुपयांचे अर्थसाहाय्य मंजूर केले आहे. स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 'एक्स'वर पोस्ट करत याबाबत घोषणा केली आहे.
देशभरातील पर्यटनाला चालना देण्यासाठी केंद्र सरकारच्या पर्यावरण मंत्रालयाने दोन महिन्यांपूर्वी २३ राज्यांकडून प्रस्ताव मागविले होते. एकूण प्राप्त प्रस्तावांपैकी २३ राज्यांमधील ४० प्रकल्पांना विशेष साहाय्य योजनेंतर्गत मान्यता देण्यात आली आहे. प्रकल्पांची एकूण किंमत ३,२९५ कोटी रुपये आहे. राज्यात नाशिक शहर व सिंधुदुर्ग या दोन शहरांचा या प्रकल्पामध्ये समावेश करण्यात आला आहे.
सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या समुद्रात समुद्री पर्यटन विकासासाठी पाणबुडी प्रकल्प मंजूर करण्यात आला होता. मात्र, चार पाच वर्षात याबाबत कोणतीच कार्यवाही झाली नव्हती. प्रकल्प होण्यासाठी हालचाली झाल्या नव्हत्या. हा प्रकल्प राज्याबाहेर गेल्याचा आरोप झाला होता. यावरून सत्ताधारी आणि विरोधक यांच्यात टीकाटिपणी करून राजकीय रंग देण्यात आला होता. मात्र केंद्र सरकारने ४६.१६ कोटी रुपये मंजूर करून हा प्रकल्प जिल्ह्यातच होणार असल्याचे स्पष्ट केले आहे.
नाशिक आणि सिंधुदुर्गच्या पर्यटन विकासासाठी भरीव निधी मंजूर केल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांनी विशेष आभार मानले आहेत. 'एक्स' वर केलेल्या पोस्टमध्ये फडणवीस म्हणतात, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दूरदर्शी नेतृत्वाखाली आणि केंद्रीय मंत्री गजेंद्रसिंह शेखावत यांच्या प्रयत्नांमुळे महाराष्ट्राला जागतिक पर्यटनाच्या नकाशावर मोठ्या प्रकल्पांच्या माध्यमातून चमकण्यासाठी चालना मिळणार आहे. राज्यातील पर्यटन प्रकल्पामुळे स्थानिक अर्थव्यवस्था बळकट होण्याबरोबरच रोजगारालाही चालना मिळणार आहे.