

मुंबई : मालवणातील किल्ले सिंधुदुर्गात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या ‘श्री शिवराजेश्वर’ मंदिराच्या दिवाबत्ती आणि देखभालीसाठी राज्य सरकारकडून दिल्या जाणाऱ्या अनुदानात भरीव वाढ करण्यात आली आहे. वार्षिक तीन हजार रुपयांवरून आता हा निधी वार्षिक एक लाख रुपये करण्यात आला आहे. विशेष म्हणजे तब्बल 56 वर्षांनंतर या अनुदान रकमेत वाढ करण्यात आली आहे.
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण तालुक्यातील किल्ले सिंधुदुर्ग येथे छत्रपती शिवाजी महाराजांचे मंदिर आहे. प्रत्यक्ष छत्रपतींच्या हातांचे ठसे असणारे हे ऐतिहासिक ठिकाण. येथील ‘श्री शिवराजेश्वर मंदिर’ व्यवस्थापन पाहणाऱ्या मंदिर न्यासाला राज्याच्या महसूल विभागाकडून दर महिना 250 रुपये या प्रमाणे वर्षाकाठी 3 हजार रुपयांचे अनुदान देखभाल व दिवाबत्तीच्या खर्चापोटी दिले जातेे. 1 एप्रिल 1970 पासून ही पद्धत रूढ आहे. मात्र, मागील 56 वर्षांत या अनुदानात कोणतीच वाढ करण्यात आली नाही. त्यामुळे न्यासाच्या विश्वस्तांनी अनुदानात वाढ करण्याची मागणी केली होती.
श्री शिवराजेश्वर देवालयातील पुजारी व इतर सेवेकरी यांचे पगार, मंदिराच्या दिवाबत्तीचा खर्च तसेच, मंदिराकडून आयोजित केल्या जाणाऱ्या उत्सवासाठी या अनुदानाची रक्कम अत्यंत कमी पडत असल्याने अनुदानात वाढ करण्याबाबत विनंती करण्यात आली होती.
त्यानुसार राज्य सरकारने या अनुदानात वाढ करण्याचा निर्णय केला आहे. राज्याच्या महसूल विभागाने बुधवारी तसा शासन निर्णय (जीआर) जारी केला आहे. त्यानुसार आता किल्ले सिंधुदुर्गावरील छत्रपती शिवाजी महाराजांच्या शिवराजेश्वर मंदिराच्या दिवाबत्ती, पुजारी तसेच सेवेकऱ्यांच्या मानधनावरील खर्च अनुदानात प्रतिमाह 8 हजार 333 रुपये याप्रमाणे वर्षास 1 लाख इतके अनुदान मंजूर करण्यात येत असल्याचे जीआरमध्ये नमूद करण्यात आले आहे.