

मुंबई : ‘हासरा नाचरा जरासा लाजरा, सुंदर साजिरा श्रावण आला’
श्रावण महिना म्हणजे उत्सवांचा महिना. म्हणूनच याला सणांचा राजा श्रावण असेही म्हणतात. पावसाळा सुरू झाला की, अनेक जण विशेषतः महिला या श्रावण महिन्याची आतुरतेने वाट पाहतात. यंदा शुक्रवारी 25 जुलैपासून म्हणजे काहीसा लवकरच श्रावण सुरू झाला. विशेष म्हणजे दुसर्याच दिवशी पहिला श्रावण शनिवार आल्याने महिलावर्गामध्ये कमालीचा उत्साह पहायला मिळाला.
श्रावणातील पावसाचे वैशिष्ट्य म्हणजे क्षणात पाऊस आणि क्षणात ऊन दिसून येते. पण यावेळी मुंबईतील परिस्थिती वेगळी होती. मनाला ऊभारी आणणार्या या श्रावण महिन्याचे मुंबईत मुसळधारपणे कोसळत पावसाने स्वागत केले. शहर उपनगरात दिवसभर पाऊस सुरू राहिल्याने पहिल्या शनिवारचे पुजासाहीत आणि अन्य खरेदीसाठी महिलांना बाहेरच पडता आले नाही. सायंकाळी पावसाने काहिशी उसंत घेतल्यानंतर बाजारपेठा गजबजू लागल्या.
पुजा साहित्याबरोबरच अगदी रसरशीत हिरव्या भाज्यांचीही मोठ्या प्रमाणात खरेदी सुरू होती. शनिवार उपवास असल्याने गाईला पान देण्याची आणि घरी केळीच्या पानावर जेवण्याची प्रथा आहे. त्यामुळे केळीच्या पानांचीही खरेदी सुरू होती. मोठ्या पानाचा दर (दोन तुकडे होणार्या) दहा रुपयांच्या आसपास होता. जवळपास सर्वच हिरव्यागार भाज्यांनी शंभरी गाठली होती. तरीही विविध प्रकारच्या भाज्यांची खरेदी सुरू होती. विशेशत: पालेभाज्यांची खरेदी जोरात सुरू होती.
श्रावण शनिवारी, अश्वत्थ मारुतीची पूजा करणे शुभ मानले जाते. अश्वत्थ मारुती म्हणजे पिंपळाच्या झाडाखाली असलेल्या हनुमानाची पूजा. अश्वत्थ म्हणजे पिंपळाचे झाड आणि या झाडाखाली हनुमानाची मूर्ती असल्यास, त्याला अश्वत्थ मारुती म्हणतात. श्रावणात विशेषतः शनिवारी अश्वत्थ मारुतीची पूजा करण्याची प्रथा आहे. श्रावणी शनिवारी शनिदेवाची पूजा केल्याने शनिदेवाचा आशीर्वाद मिळतो आणि शनिदेवाची साडेसाती किंवा शनिचा अशुभ प्रभाव कमी होतो, असे मानले जाते.
पहिला : 26 जुलै
दुसरा : 2 ऑगस्ट
तिसरा : 9 ऑगस्ट
चौथा : 16 ऑगस्ट
पाचवा : 23 ऑगस्ट