TET Paper Leak Case | अवघ्या ८ हजारांत फुटला टीईटीचा पेपर; भिवंडीत येईपर्यंत झाला दीड कोटींचा

TET Paper Leak Case |
TET Paper Leak Case | अवघ्या ८ हजारांत फुटला टीईटीचा पेपर; भिवंडीत येईपर्यंत झाला दीड कोटींचा
Published on
Updated on

संजय भोईर

भिवंडी : देशात नीट परीक्षेच्या पेपरफुटीचे वादळ अद्याप शांत झालेले नसतानाच महाराष्ट्रातील ६ लाखांहून अधिक शिक्षकांचे भवितव्य ठरवणाऱ्या शिक्षक पात्रता परीक्षा (टीईटी) पेपरफुटी प्रकरणात धक्कादायक माहिती समोर आली आहे. उत्तर प्रदेशातील आग्रा येथील छापखान्यातून अवघ्या आठ हजार रुपयांत बाहेर पडलेला प्रश्नपत्रिकेचा संच दलालांच्या साखळीतून फिरत-फिरत भिवंडीत पोहोचेपर्यंत त्याची किंमत तब्बल दीड कोटी रुपयांवर गेल्याचा धक्कादायक खुलासा पोलिस तपासातून समोर आला आहे.

शिक्षक होण्याची स्वप्ने पाहणाऱ्या लाखो उमेदवारांच्या भविष्याचा बाजार मांडणाऱ्या टीईटी पेपरफुटी रॅकेटचे धक्कादायक धागेदोरे भिवंडी पोलिसांनी उलगडले आहेत. तपासात समोर आलेल्या माहितीनुसार, छापखान्यातील कर्मचारी नरेशकुमारने हा पेपर मुख्य फरार आरोपी बिजेंद्र गुप्ताचा साथीदार सोनू याला अवघ्या ८ हजार रुपयांत विकला. त्यानंतर बिजेंद्र गुप्ताने आपल्या राज्यनिहाय एजंट आणि दलालांच्या जाळ्याद्वारे तो पेपर प्रथम ८० हजार रुपयांना विकला.

त्यानंतर प्रत्येक टप्प्यावर दलालांनी स्वतःचा नफा जोडत हा सौदा वाढवत नेला आणि भिवंडीपर्यंत पोहोचेपर्यंत त्याची किंमत तब्बल दीड कोटी रुपयांवर गेली, अशी धक्कादायक माहिती सूत्रांनी दिली. विशेष म्हणजे, या गुन्ह्यात अटक करण्यात आलेल्या आरोपींकडून प्रश्नपत्रिकेची मूळ प्रतच जप्त करण्यात आली आहे. या संपूर्ण रॅकेटचा मुख्य सूत्रधार बिहारचा रहिवासी बिजेंद्र गुप्ता असून, तो अद्याप फरार आहे.

पोलिस सूत्रांनुसार, बिजेंद्रची कार्यपद्धती अत्यंत नियोजनबद्ध होती. देशभरातील विविध राज्यांच्या गोपनीय प्रश्नपत्रिका ज्या छापखान्यांमध्ये छापल्या जातात, अशा छापखान्यांचा तो शोध घेत असे. तेथील कर्मचाऱ्यांना पैशांचे आमिष दाखवून आपल्या जाळ्यात ओढत असे. कोणत्याही राज्याची प्रश्नपत्रिका छापखान्यात आली की ती त्याच्यापर्यंत पोहोचवली जात असे. त्यानंतर संबंधित राज्यातील एजंटांच्या माध्यमातून ग्राहक शोधून लाखो रुपयांत सौदे केले जात असल्याचे तपासात उघड झाले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news