मुंबई : क्रॉफर्ड मार्केट येथील छत्रपती शिवाजी महाराज मासळी बाजाराचा पुनर्विकास वादाच्या भोवर्यात सापडला आहे. मुंबई महानगरपालिका पुनर्विकासावर ठाम असून या मार्केटमध्ये गेल्या कित्येक वर्षांपासून मासळीचा व्यवसाय करणार्या कोळी बांधवांनी याला जोरदार विरोध केला आहे.
बोली पद्धतीने ही जागा भाडेकरावर देणे कायद्याला धरून नाही. व्यावसायिकांना विश्वासात न घेता या भूखंडाची बोली करण्यात आल्याचा आरोपही मच्छिमारांनी केला आहे.
क्रॉफर्ड मार्केट येथील छत्रपती शिवाजी महाराज मासळी बाजाराची मोक्याची जागा भाडेतत्त्वावर देण्याची प्रक्रिया सुमारे सहा महिन्यांपूर्वीच सुरू झाली आहे. ही प्रक्रिया आता पूर्ण झाली आहे. त्यामुळे यामध्ये हस्तक्षेप अथवा बदल करता येणार नसल्याचे मुंबई महानगरपालिकेने स्पष्ट केले आहे.
एवढेच नाही तर येथील मासळी विक्रेत्यांचे महात्मा फुले मंडईत कायमस्वरूपी पुनर्वसन करण्यात आल्याचेही पालिकेने स्पष्ट केले. बाजाराची इमारत अतिधोकादायक घोषित केल्यापासून या बाजारातील मासळी विक्रेते, कोळी बांधव, संबंधित संघटना यांच्यासह लोकप्रतिनिधींनी देखील महानगरपालिकेकडे वेळोवेळी केली. त्यानुसारच त्यांचे पुनर्वसन करण्यात आल्याचे पालिकेकडून सांगण्यात आले. मात्र महापालिका खोटे बोलत असल्याचा आरोप अखिल महाराष्ट्र मच्छीमार कृती समितीचे अध्यक्ष देवेंद्र तांडेल यांनी केला आहे.
मुंबई महापालिकेने शिवाजी मंडई 2021 मध्ये अतिधोकादायक म्हणून घोषित केली. त्यावेळी मासळी मंडईतील कोळी महिला तसेच मासळी व्यावसायिकांना ऐरोली येथील जंगलात स्थलांतरित करण्यात आले होते. त्यावेळी दोन मासळी विक्रेत्या व्यावसायिकांचा सर्पदंशाने निधन झाले होते.
ऑगस्ट 2021 मध्ये मच्छिमार जन आक्रोश मोर्चा पालिका मुख्यालयावर धडकल्यानंतर पालिकेला शरण पत्करावी लागली होती. त्यानंतर त्यांनी या मासळी व्यावसायिकांना शिवाजी मंडई येथेच शेड आणि मूलभूत सुविधा उपलब्ध करून दिल्या. शिवाजी मंडईचा मोक्याचा भूखंड खासगी बिल्डरांच्या घशात घालून कोळी बांधवांवर महापालिकेने अन्याय केला आहे. त्यामुळे जोपर्यंत मच्छिमार समाजाला न्याय मिळणार नाही, तोपर्यंत रस्त्यावरची लढाई लढली जाणार असल्याचे मच्छिमार समितीकडून सांगण्यात आले आहे.
महात्मा फुले मंडईमध्ये आंतरराष्ट्रीय दर्जाची व्यवस्था आली असल्याचे पालिका सांगत आहे. पण ते दिशाभूल करणारे आहे. तळघरामध्ये घाऊक मासळी विक्रेत्यांचे नियोजन करण्यात आले आहे. तर मासळी विक्रेत्या कोळी महिलांना तळ मजल्यांवर अतिशय छोटे गाळे देण्यात आले आहेत. तळघरात जाण्यासाठी पायर्यांचे आणि लिफ्टचे प्रयोजन केले आहे. हीच लिफ्ट तळघरापासून तिसर्या मजल्यापर्यंत सर्वांसाठी देण्यात आली आहे. त्याशिवाय छत्रपती शिवाजी महाराज मासळी मंडईपेक्षा अर्ध्या जागेत पुनर्वसन करण्याचा घाट पालिकेने घातला आहे.
कोळी समाजाने आज (10 जुलै) क्रॉफर्ड मार्केट येथे जाहीर सभेचे आयोजन केले आहे. या सभेत पालिकेच्या विरोधात मच्छिमार जन आक्रोश मोर्चा काढण्यासंदर्भात चर्चा करून तारीख जाहीर करण्यात येणार असल्याचे संघटनांकडून सांगण्यात आले आहे.