

मुंबई; पुढारी वृत्तसेवा : राज्याच्या राजकारणात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यात सारे काही आलबेल नसल्याची चर्चा रंगत असताना आता शिंदे गटाचे आमदार आणि नेत्यांची वाय दर्जाची सुरक्षा काढून घेतल्याची माहिती समोर आली आहे. फडणवीस यांच्याकडे असलेल्या गृह खात्याने या नेत्यांची सुरक्षा विषयक जोखमीचे मूल्यांकन केले. त्यानुसार शिवसेना आमदार आणि नेत्यांची सुरक्षा कपात करण्यात आली आहे.
यामुळे शिवसेना नेत्यांनी संताप व्यक्त केला. शिवसेना नेत्यांसोबतच भाजप आणि राष्ट्रवादीतील काही नेत्यांचीही सुरक्षा कमी करण्यात आली आहे. ज्या नेत्यांच्या जीवाला कोणताही धोका नाही, अशा शिवसेनेच्या नेत्यांची सुरक्षा कमी करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.
शिवसेना फुटल्यानंतर एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाले आणि त्यानंतर त्यांनी शिवसेना आमदारांच्या सुरक्षेत वाढ केली. शिंदेंसोबत आलेल्या आमदारांना त्यावेळी वाय दर्जाची सुरक्षा देण्यात आली. या आमदारांच्या पुढे-मागे पोलिसांच्या गाड्या असायच्या. तसेच या आमदारांच्या घराबाहेरही पोलिस सुरक्षा तैनात असायची. ही सर्व सुरक्षा आता कमी करण्यात आली आहे.
यावरून अनेकदा सरकारवर आक्षेप घेण्यात आले होते. पण अडीच वर्षांच्या काळात ती सुरक्षा कायम ठेवण्यात आली होती. आता फडणवीस सरकारने अखेर त्यामध्ये कपात केली आहे. नव्या नियमानुसार, शिंदेंच्या आमदारांच्या मागे पुढे असणाऱ्या पोलिस गाड्या कमी करण्यात आल्या आहेत. तसेच त्यांच्या घराबाहेरील पोलिसही कमी करण्यात येणार आहेत. शिंदेंच्या आमदारांसोबत आता एकच सुरक्षा रक्षक असणार आहे.