

Eknath Shinde Anandraj Ambedkar Alliance
मुंबई: राज्यातील आगामी निवडणुकीसाठी शिवसेना आणि रिपब्लिकन सेनेच्या युतीची घोषणा शिंदे शिवसेनेचे नेते व उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि रिपब्लिकन सेनेचे प्रमुख आनंदराज आंबेडकर यांनी आज (दि.१६) संयुक्तपणे केली. यावेळी दोघांनीही पत्रकार परिषदेत संबोधन केले.
एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असताना त्यांनी अनेक चांगल्या योजना आणल्या. सर्वांना सोबत घेऊन जाणारे ते नेते आहेत. त्यामुळे आम्ही त्यांच्यासोबत जाण्याचा निर्णय घेतला आहे. आंबेडकर कार्यकर्त्यांना सांभाळून घेण्याची विनंती त्यांना आम्ही केली आहे. राज्यातील आगामी सर्व निवडणुकीसाठी आमची युती काम करेल, अशी प्रतिक्रिया रिपब्लिकन सेनेचे प्रमुख आनंदराज आंबेडकर यांनी यावेळी दिली.
महाराष्ट्रात ही युती आजची नाही. डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि प्रबोधन ठाकरे यांच्या पासून सुरू असलेली ही युती आहे. आंबेडकरी समाज अनेक वर्ष रस्त्यावरची लढाई लढत आला आहे. स्थानिक निवडणुकीत आंबेडकरी समाजाला, कार्यकर्त्यांना सत्तेचा लाभ व्हावा, म्हणून आम्ही एकत्र आलो आहोत. या देशामधील प्रत्येक माणूस हा संविधानावर चालतो. त्यामुळे आमच्या विचारांचा प्रश्न येत नाही. लाडकी बहीण सारखे उपक्रम त्यांनी आणले, म्हणून आम्ही त्यांच्यासोबत आलो आहोत. कोणत्याही अटी न टाकता आम्ही सोबत आलो आहोत, असे आंबेडकर म्हणाले.
आमच्या युतीतील एक पक्ष दिवंगत शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांचा वारसा सांगणार आहे. तर दुसरा पक्ष भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा वारसा असणारा पक्ष आहे. त्यामुळे आमचं दोघांचं चांगलं जमेल. आनंदराज हे डॉ. बाबासाहेबांचे रक्ताचे वारसदार आहेत. डॉ. बाबासाहेबांच्या संविधानामुळे सर्वसामान्य माणूस उच्च पदावर पोहोचला आहे.
उपमुख्यमंत्री शिंदे म्हणाले की, शिवसेना आणि रिपब्लिकन सेनेची युती झाली, असे मी जाहीर करतो. आपल्या सगळ्यांच्या दृष्टीने आनंदाचा दिवस आहे. शिवसेना आणि रिपब्लिकन सेना या दोन्ही सेना आहेत. आणि रस्त्यावर अन्याय विरोध लढणाऱ्या सेना आहेत. एक बाळासाहेबांचा विचारांचा वारसा घेऊन चालणारी आणि दुसरी बाबासाहेबांच्या रक्ताचा विचार घेऊन चालणारी सेना आहे. मी मुख्यमंत्री असताना कार्यकर्ता म्हणून काम केले. आनंदराज आंबेडकर हे बाबासाहेबांच्या रक्ताचे वारसदार आहेत. एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाला बाबासाहेबांच्या संविधानामुळे, नरेंद्र मोदी हे बाबासाहेबांच्या संविधानामुळे पंतप्रधान झाले.