Shiv Sena defections Magathane : मागाठाण्यात उबाठा शिवसेनेतील गळती सुरूच !
मुंबई ः शिवसैनिकांची हेळसांड सुरूच राहिल्याने परिस्थितीला कंटाळून मागाठाण्यात उत्तर मुंबईतील उद्धव बाळासाहेब ठाकरे (उबाठा) शिवसेनेच्या सुमारे 50 शिवसैनिकांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत नुकताच प्रवेश केला आहे.
उत्तर मुंबईतील दहिसर, मागाठाणे हे विधानसभा मतदारसंघ अनेक वर्षांपासून उबाठा पक्षाचे भक्कम गड मानले जात. याच उत्तर मुंबईतून तेव्हाच्या शिवसेनेतून मुंबईचे महापौरपदेही भूषवली आहेत. मात्र, आता परिस्थती बदलली आहे.
दहिसर पूर्वेतील रावळपाड्यात उबाठा पक्षाचे शाखा क्रमांक 3 आणि 4 मधील तत्कालीन उपविभागप्रमुख राजू मुल्ला यांच्यासह अनेक पदाधिकार्यांची पदे काही महिन्यांपूर्वी अचानक काढून घेतल्याने त्याचे पडसाद उमटताच वरिष्ठ पातळीवर हालचाली सुरू झाल्या आणि राजू मुल्ला यांच्यावरील अन्यायाचे परिमार्जन करण्यात येईल, असे चित्र निर्माण झाले होते. मात्र कोणताही निर्णय अजून झाला नाही. शेवटी पक्षाच्या भूमिकेस कंटाळलेले शिवसैनिक शिंदे सेनेत गेले.
उबाठामधून बाहेर पडलेल्यांमध्ये सध्याचे उपविभाग समन्वयक व शाखाप्रमुख अजित जाधव, उपशाखाप्रमुख जगदीश भाले, प्रविण मोरे, सुरेश गुरव, सुनिल कावनकर, दयानंद भांडेकर, गटप्रमुख विजय जाधव, अंकुश वनगे, उमेश कांबळे, संतोष जाधव, दत्ता परब, अजित जाधव, विजय चौगुले, राम आटोळे, आबासाहेब जोगदंड, वसंत चौगुले गणेश हजारे आदी महत्त्वाचे शिवसैनिक आहेत.
पक्षात निराशा झाल्याने त्यांनी दुसरा पक्ष निवडला असला तरी राजू मुल्ला यांनी उबाठाशी एकनिष्ठ राहण्याची ग्वाही दिली. पदापेक्षा पक्ष महत्त्वाचा अशी भूमिका घेत सामाजिक कार्य सुरू ठेवले आहे. परंतु, नेहमीच अन्याय होत राहिल्यास ते योग्य नसल्याची भूमिका घेत त्यांच्यासोबतच्या सुमारे 50 कार्यकत्यांनी पक्षास रामराम ठोकला.
सातत्याने यासंदर्भात दाद मागूनही न्याय मिळत नसल्याने शेवटी कंटाळून कार्यकर्ते अन्य पक्षात जात आहेत. मागाठाण्याचा कोसळलेला किल्ला नव्याने बांधण्यासाठी पुढे आलेल्या कार्यकर्त्यांना सक्रीय पाठिंबा मिळण्याऐवजी त्यांचे खच्चीकरण केले जात असल्याने उबाठास लागलेली गळती कमी होण्याऐवजी वाढत चालली आहे.
राजू मुल्ला यांचे पद काढून घेण्यामागे मुंबई महापालिकेची आगामी निवडणूक असल्याचे सांगण्यात येते. स्थानिक पातळीवर सामाजिक क्षेत्रात तळागाळात पोहोचलेल्या राजू मुल्ला यांना पदावरुन काढल्यास तिथे आपला वरचष्मा निर्माण करता येईल, असा एका गटाचा होरा आहे.

