

मुंबई : 25 वर्षांची उद्धव ठाकरे यांची मुंबई महापालिकेतील सत्ता भाजप आणि शिंदे शिवसेनेने उलथवून टाकली असली, तरी मुंबई महापालिकेच्या सत्तेत अडीच-अडीच वर्षे महापौरपद असा ‘फॉर्म्युला’ शिंदे यांनी भाजपपुढे ठेवला आहे. तसेच, स्थायी समितीचे अध्यक्षपदही अडीच वर्षे हवे, असा हट्ट उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी धरला असल्याचे खात्रीलायक सूत्रांनी स्पष्ट केले. दरम्यान, मुंबईतील आपल्या 29 नगरसेवकांना फोडण्याबाबत काही दगाफटका होऊ नये, यासाठी खबरदारीचा उपाय म्हणून शिंदे यांनी आपल्या 29 नगरसेवकांना वांद्रे येथील ‘ताज लँडस् एंड’ या पंचतारांकित हॉटेलमध्ये ठेवले आहे.
भाजपने मुंबई महापालिकेत सर्वाधिक 89 जागा जिंकल्या असल्या, तरी सत्तेसाठीची 114 ही जादुई संख्या गाठण्यासाठी त्यांना शिंदे गटाच्या 29 नगरसेवकांची गरज आहे. तसेच, भाजपला आपला महापौर निवडून आणायचा असेल, तर 25 नगरसेवकांची गरज आहे. ही 25 संख्या भाजपला दुसरीकडून मिळण्याची सूतराम शक्यता नाही. त्यामुळे शिंदे यांनी आपले पत्ते टाकायला सुरुवात केली आहे. यात शिंदे यांचा नेम फक्त मुंबई महापालिका नसून, नवी मुंबई आणि कल्याण-डोंबिवली महापालिकेतील सत्तेचा वाटा यावरही आहे.
2024 च्या विधानसभा निवडणुकीत राज्यात भाजप, शिंदे गट, अजित पवार गट महायुतीची सत्ता आली तेव्हा मुख्यमंत्रिपदासाठी शिंदे यांनी शेवटपर्यंत हट्ट सोडला नव्हता. देवेंद्र फडणवीस यांच्या शपथविधीपूर्वी एक तास आधी राज्यपालांकडे पाठिंब्याचे पत्र दिले होते. त्यामुळे आता भाजपला मुंबई महापालिकेच्या सत्तेत शिंदे यांच्याशिवाय दुसरा पर्याय नाही. त्यामुळे शिंदे यांचे 29 नगरसेवक खूप महत्त्वाचे आहेत.
ठाणे महापालिकेत भाजपने सत्तेचा निम्मा वाटा मागितला आहे. तसेच, छत्रपती संभाजीनगर महापालिकेतही भाजपच्या शिंदे यांना बाजूला ठेवून स्वबळावर आपला महापौर बनविण्याच्या हालचाली सुरू आहेत. ठाण्यात आम्हाला सत्तेत निम्मा वाटा पाहिजे; अन्यथा आम्ही ठाण्यात विरोधी बाकावर बसू, असा इशारा भाजपच्या स्थानिक नेत्यांनी दिला आहे. त्यामुळे शिंदे यांनी, मुंबईच्या सत्तेत अडीच वर्षे महापौरपद आणि अडीच वर्षे स्थायी समिती असा हट्ट धरला असल्याचे कळते. त्यामुळे भाजप सावध पावले टाकत आहे.
मुंबई महापालिकेचा महापौर हा मराठीच असेल, अशी भूमिका ठाकरे बंधूंनी घेतली होती, त्यावर भाजपने महापौर हिंदू होईल, असे सांगितले; पण शेवटी हिंदू मराठी असेल, अशी भूमिका भाजपला घ्यावी लागली. भाजप मराठी महापौर करणार आहे. महापौरपदासाठी पुढील आठवड्यात नगरविकास खात्याकडून सोडत काढली जाईल. त्यानंतर दहा दिवसांनी महापौरपदासाठीची निवडणूक लागेल. त्यामुळे हा काळ मोठा आहे, त्यामुळे शिंदे खबरदारी घेत आहेत. दुसरीकडे, उद्धव ठाकरे यांनी, ‘देवा’च्या मनात असेल तर आपला महापौर होईल, असे वक्तव्य केले आहे. त्यामुळे चर्चेंना उधाण आले आहे.
छत्रपती संभाजीनगरात भाजप शिंदे सेनेला सत्तेबाहेर ठेवणार?
छत्रपती संभाजीनगर : लातूर येथे काँग्रेसने आणि परभणी येथे शिवसेना ठाकरे गटाने बहुमत मिळविले; तर नांदेड आणि जालना महापालिकांत भाजपने स्पष्ट बहुमतासह सत्ता काबीज केली. छत्रपती संभाजीनगरात भाजप बहुमतापासून एक जागा दूर राहिला. या ठिकाणी भाजपने मित्रपक्ष शिवसेनेला बाजूला ठेवून छोट्या पक्षांच्या मदतीने सत्ता मिळविण्याचा प्रयत्न चालविला आहे. त्या अनुषंगाने भाजपने छोट्या पक्षांसोबतच चर्चाही सुरू केली आहे.
महापौरपदाची आरक्षण सोडत 22 जानेवारीला?
महाराष्ट्रातील 29 महानगरपालिकांचे निकाल लागले असले, तरी प्रथम नागरिक कोण होणार, हे ठरवणारी महापौरपदाची सोडत अद्याप बाकी आहे. नगरविकास खात्यातर्फे आयोजित केली जाणारी ही सोडत येत्या 22 जानेवारीला होणार असल्याचे विश्वसनीयरीत्या समजते. सोडत निघाल्यानंतर मुंबईचे महापौरपद कोणत्या प्रवर्गासाठी आरक्षित होईल की खुले असेल, याचा निर्णय लागणार आहे. त्यानंतर यासंदर्भातील राजकीय हालचालींना वेग येईल. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मुंबईचा महापौर जानेवारीच्या अखेरीस किंवा फेब्रुवारीच्या एक-दोन तारखेकडे निश्चित होईल.