

मुंबई : उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना राज्यात सुरू करण्यात आलेली शिवभोजन थाळी योजना यापुढेही सुरूच राहणार आहे. राज्याचे महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी शनिवारी महत्त्वपूर्ण घोषणा करत शिवभोजन थाळी योजना सुरूच ठेवणार असल्याचे स्पष्ट केलेे. या योजनेसाठी सरकारने 200 कोटी रुपये मंजूर केले आहेत. यामुळे आर्थिकद़ृष्ट्या दुर्बल घटकांना कमी दरात पौष्टिक भोजन मिळणे सुरूच राहणार आहे.
महाविकास आघाडी सरकारच्या काळात तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ही योजना सुरू केली होती. गरजू लोकांसाठी ही योजना मोठा आधार ठरली आहे. आता महायुती सरकारने या योजनेला कायम ठेवण्याचा निर्णय घेतल्यामुळे लाखो लोकांना दिलासा मिळाला आहे.
मंजूर करण्यात आलेल्या 200 कोटी रुपयांच्या निधीमुळे योजनेची अंमलबजावणी अधिक प्रभावीपणे आणि सुरळीतपणे होईल. चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितले की, या योजनेला सरकारचा पूर्ण पाठिंबा आहे आणि भविष्यातही ही योजना सुरू राहील. या निर्णयामुळे राज्यातील नागरिकांना स्वस्त आणि सकस भोजन उपलब्ध होत राहील.