

मालाड : मालाड, गोरेगावसहित मुंबई आणि राज्यातील शिवभोजन केंद्रांना मागील 7 महिन्यांपासून पैसे मिळालेलेच नाहीत. महाविकास आघाडी सरकारने गोरगरिबांसाठी पोटभर जेवण मिळावे यासाठी शिवभोजन थाळी ही योजना 2019 पासून सुरु केली होती. या योजनेतून सुरुवातीला 2 लाख थाळ्या म्हणजे 2 लाख लोकांना लाभ मिळत होता. मात्र सध्या या केंद्रांना मागील 7 महिन्यांपासून महिन्याचे बिलाची रक्कमच मिळाली नसल्याने त्यांच्या अस्तित्वाचा प्रश्न उपस्थित झाला आहे.
शासनाने 2019 मध्ये गरीब व गरजुंसाठी शिवभोजन थाळी ही योजना लागू केली होती. सदर योजनेनुसार 2019 पासून संपूर्ण महाराष्ट्रामध्ये एकूण 2258 इतकी शिवभोजन केंद्रे कार्यरत होती. सद्यस्थितीत 1884 इतकी शिवभोजन केंद्रे संपूर्ण महाराष्ट्रात कार्यरत आहेत. मात्र 15 फेब्रुवारीपासून शासनामार्फत या शिवभोजन केंद्रांचे पैसे देण्यात आलेले नाहीत. त्यामुळे शिवभोजन केंद्रे चालवणे केंद्रचालकांना अशक्य झाले आहे.
केंद्रातील कामगारांचा पगार, थाळी बनवण्यासाठी लागणारे साहित्य, केंद्राच्या जागेचे भाडे, वीजबिल, पाणी बिल, गॅस यांसारखे असंख्य खर्च केंद्राचालकांना करावे लागतात. केंद्रचालकांना दागिने गहाण ठेवून तसेच बाजारातून व्याजाने कर्ज घेऊन हा खर्च भागवावा लागत आहे. त्यामुळे जे केंद्रचालक जनतेच्या खाण्याची व्यवस्था करत आहेत, त्यांच्यावरच आज उपासमारीची व कर्जबाजारी होण्याची वेळ आलेली आहे.
या केंद्रांचे बिल शासनाने लवकरात लवकर द्यावी या साठी दिंडोशीचे आमदार सुनील प्रभू आणि धाराशिवचे खासदार ओमराजे निंबाळकर यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ, उपमुख्यमंत्री अजित पवार, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्र लिहून केंद्रचालकांचे थकीत देयके देण्याची मागणी केली आहे.
महिलांचा रोजगार धोक्यात
एका केंद्रात 9 ते 10 लोक, विशेष करून महिला कामगार काम करतात. त्यांच्या रोजगाराचा प्रश्न निर्माण झाला आहे. तसेच दर दिवसाला 2 लाख गरजू या योजनेचा लाभ घेतात. त्यांचीही गैरसोय होणार आहे. शिवभोजन थाळी पुरवणारी अधिकतर केंद्रे महिला बचत गटांमार्फत चालवली जात आहेत. त्यामुळे जर ही केंद्रे बंद झाली, तर या बचत गटातील मोठ्या प्रमाणात महिला या बेरोजगार होतील.
दररोज दोनशे थाळ्या आम्ही लाभार्थ्यांना पुरवतो. त्यासाठी आम्हाला लाभार्थ्यांकडून 10 रुपये, तर शासनाकडून 40रुपये मिळतात. मात्र मागील 7 महिन्यांपासून आमची बिले थकल्याने आमच्यासमोर आर्थिक प्रश्न निर्माण झाला आहे. केंद्र चालवण्यासाठी सुरुवातीला किराणा दुकानातून उधारीवर धान्य घ्यावे लागले. नंतर त्यांची उधारी देण्यासाठी दागिने गहाण ठेवून, नातेवाईकांकडून उसने घेऊन, तर कधी व्याजाने पैसे घेऊन आम्ही ही केंद्र सुरू ठेवली आहेत. आमच्या सोबत 10 कुटुंबाचा उदरनिर्वाह चालतो, तसेच दोनशे गोरगरीब लाभार्थी यावर अवलंबून आहेत. सरकारने तातडीने यात लक्ष घालून आमचे पैसे द्यावेत.
लक्ष्मी भाटिया, केंद्र चालक, गोरेगाव, जय भवानी महिला बचत गट अध्यक्षा
मी नाका कामगार आहे. मिळेल ते काम करून उपजीविका चालवतो. मात्र अनेक वेळी कामच मिळत नाही अशी आमची परिस्थिती आहे. शिवभोजन थाळी योजनेमुळे किमान एक वेळ तरी पोटभर जेवण मिळण्याची शाश्वती आहे. मायबाप सरकारने आमच्यावर दया करावी.
कृष्णा वाघमारे, लाभार्थी
मी सध्या नोकरीच्या शोधात आहे. शिवभोजन थाळी योजनेचा माझ्यासारख्या अनेक बेरोजगार आणि गरजूंना लाभ होतो. सरकारने याकडे माणुसकीच्या दृष्टिकोनातून लक्ष द्यावे
ओंकार महाडिक, लाभार्थी रिक्षाचालक तरुण