Shirdi defence hub | शिर्डीत उभारणार जगातील तिसर्‍या क्रमांकाचा डिफेन्स हब

तीन हजार एकरांवर उभारणार चीनच्या तोडीचा प्रकल्प
Shirdi defence hub |
Shirdi defence hub | शिर्डीत उभारणार जगातील तिसर्‍या क्रमांकाचा डिफेन्स हब
Published on
Updated on

मुंबई : चीनच्या धर्तीवर संरक्षण साहित्यात उत्पादन क्षमतेचे मोठे उद्दिष्ट गाठणारा डिफेन्स हब महाराष्ट्रातील शिर्डी येथे उभारला जाणार आहे. सुमारे 3 हजार एकरांवर उभारला जाणारा हा जगातील तिसर्‍या क्रमांकाचा हब असेल. 23 मे रोजी या डिफेन्स हबचे संरक्षणमंत्री राजनाथ सिंह, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ अनिल चव्हाण यांच्या प्रमुख उपस्थितीत उद्घाटन होईल.

हा डिफेन्स हब देशाच्या सेवेत समर्पित करण्यासाठी महाराष्ट्र सरकारने गेले वर्षभर युद्धगतीने प्रयत्न सुरू ठेवले आहेत. जलसंपदामंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांच्या पुढाकाराने हा प्रकल्प साकार होत असून, निबे ग्रुपचे अध्यक्ष गणेश निबे यांनी या प्रकल्पासंदर्भातील माहिती पत्रपरिषदेत दिली. शिर्डी येथून भारतातील कोणत्याही कोपर्‍यात नव्या दळणवळण सुविधांमुळे केवळ दोन तासांत संरक्षण साहित्य पोहोचवता येईल. यामुळे डिफेन्स उत्पादनाच्या वाढीसाठी शिर्डी आणि अहिल्यानगर जिल्हा हा सर्वोत्तम मानला जात असल्याची माहिती जलसंपदामंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनी दिली.

हा जगातील क्रमांक तीनचा आर्टिलरी शेल उत्पादन प्रकल्प ठरणार असून, तो भारतातील सर्वात मोठा आर्टिलरी हब असेल. पहिले दोन्ही विशाल आर्टिलरी हब हे चीनमध्ये उभारले गेले आहेत. सुमारे 3 हजार कोटी रुपयांची गुंतवणूक करून तयार होणार्‍या या डिफेन्स हबची उभारणी सध्या दोनशे एकरवर केली गेली आहे. पुढे हा विस्तार 3 हजार एकरवर होईल.

बॉम्बशेल ते मिसाईलचे कपॅसिटर्स

केवळ बारा महिन्यांत हा प्रकल्प उभारण्यात आला असून, या ठिकाणी जगातील अत्याधुनिक बॉम्बशेलचे उत्पादन होणार आहे. दरवर्षी या डिफेन्स हबमध्ये पाच लाख आर्टिलरी बॉम्बशेल तयार होतील. यामध्ये मिसाईल सब सिस्टीम पिनाका तसेच ब्रह्मोस मिसाईलचे कपॅसिटर्स, विमानांचे सुटे भाग, जेट इंजिनला लागणारी सामग्री तसेच रणगाड्यांसाठी लागणारी उत्पादनसामग्री तयार होणार आहे.

70 टक्के उत्पादनांची निर्यात

भारताशी संरक्षण साहित्याची व्यापार करणार्‍या छोट्या देशांनाही या प्रकल्पातील उत्पादन निर्यात केले जाणार आहे. प्रकल्पातील सुमारे 70 टक्के उत्पादन हे विविध देशांना निर्यात केले जाईल. जगातील महासत्ता असलेले काही देशदेखील काही प्रमाणात हे उत्पादन खरेदी करतील, असा आशावाद व्यक्त करण्यात आला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news