Shinde Sena strategy | शिंदे सेनेकडून बालेकिल्ल्याची तटबंदी

Shinde Sena strategy
Shinde Sena strategy | शिंदे सेनेकडून बालेकिल्ल्याची तटबंदीPudhari
Published on
Updated on

दिलीप सपाटे, मुंबई

भाजप आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने काही महापालिकांमध्ये युती करून निवडणूक लढविली असली तरी या मित्रपक्षांमध्येही सुप्त सत्तासंघर्ष निवडणुकीत दिसून आला. विशेषतः कल्याण-डोंबिवली महापालिकेमध्ये सरशी साधून महापौरपदावर दावा मजबूत करण्यासाठी जोरदार संघर्ष झाला. दोन्ही पक्षांमध्ये आपले उमेदवार बिनविरोध निवडून आणण्यासाठी स्पर्धा रंगली. त्यात भाजपने बाजी मारली. त्यानंतर दोन्ही पक्षांत हाणामारी आणि वादाच्या घटनांनी कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या निवडणुकीला गालबोट लागले. तशीच परिस्थिती काही प्रमाणात नवी मुंबईत होती. मीरा भाईंदरमध्येही भाजप आणि शिवसेनेत लढत रंगली.

निवडणूक निकालात भाजप नंबर वन ठरली. मीरा भाईंदर, नवी मुंबईत भाजप स्वबळावर सत्तेत आली. ठाण्यात शिंदे सेनेने एकट्याच्या बळावर बहुमत मिळविले. मात्र, कल्याण-डोंबिवली आणि भिवंडी महापालिकेत दोन्ही पक्षाला जवळपास समान जागा मिळाल्या. कल्याण-डोंबिवलीत 122 पैकी 50 जागा भाजपला, तर 53 जागा शिंदे सेनेने जिंकल्या. बहुमतासाठी 62 हा जादुई आकडा गाठण्यात दोघांनाही अपयश आले, तर उल्हासनगर महापालिकेत 78 पैकी भाजपला 37, तर शिंदे सेनेनेला 36 जागा मिळाल्या. तेथेही 40 जागांचा जादुई आकडा आवश्यक होता.

निवडणूक होताच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दावोस दौर्‍यावर गेले. मात्र, एकनाथ शिंदे व खासदार श्रीकांत शिंदे यांनी वेळ न घालविता ठाणे जिल्ह्यातील आधी ताब्यात असलेल्या कल्याण-डोंबिवली आणि उल्हासनगर महापालिकेत सत्ता मिळविण्यासाठी आक्रमक डावपेच आखले. श्रीकांत शिंदे हे कल्याणचे खासदार आहेत. नगरपरिषद निवडणुकीत त्यांच्या मतदारसंघात असलेल्या अंबरनाथ नगरपरिषदेवर भाजपने आपला नगराध्यक्ष निवडून आणला. अशावेळी कल्याण-डोंबिवली व उल्हासनगर महापालिकेत भाजपने सत्ता स्थापन केली, तर पुढच्या लोकसभा निवडणुकीत कल्याण लोकसभेवरील श्रीकांत शिंदे यांच्या दाव्याला भाजपकडून आव्हान दिले जाण्याची शक्यता होती. यामुळे सावध झालेल्या शिंदेंनी दोन्ही महापालिकेत स्वबळावर सत्ता स्थापन करण्यासाठी जुळवाजुळव केली.

एकनाथ शिंदेंची व्यूहरचना यशस्वी

कल्याण-डोंबिवलीमध्ये मनसेला सोबत घेत उद्धव सेनेचे काही नगरसेवक फोडून शिंदेंनी 62 चा जादुई आकडा गाठला. तर उल्हासनगरमध्ये वंचितचे 2 व अपक्षांची मदत घेत शिंदेंनी 40 सदस्यांचे संख्याबळ एकत्र केले. दोन्ही ठिकाणी शिवसेनेचे बहुमत झाल्याने तेथील महापौरपदावरही शिवसेनेचा दावा मजबूत झाला आहे. त्यामुळे शिंदेंनी आपल्या ढासळत्या बालेकिल्ल्यांची तटबंदी मजबूत करण्याचा प्रयत्न केला आहे. ठाण्याचे महापौरपद निर्विवादपणे शिवसेनेकडे जाणार आहे. मात्र, कल्याण-डोंबिवली आणि उल्हासनगर येथे शिंदेंनी काठावरचे बहुमत जमविले असले तरी भाजप काय भूमिका घेते हे लवकरच स्पष्ट होणार आहे. दोन्ही महापालिकेवर शिवसेनेचा महापौरपदावरील दावा मान्य करते, की अडीच वर्षांसाठी महापौरपदाची मागणी करते हे देखील स्पष्ट होणार आहे. मात्र, शिंदेंनी ज्या गतीने व्यूहरचना केली ती पाहता त्यांनी आपला बालेकिल्ला सुरक्षित करण्याचा प्रयत्न केला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news