

पुढारी ऑनलाईन डेस्क : महाराष्ट्राचे पुढचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असतील यावर आता शिक्कामोर्तब झालेला आहे. भाजपने विधीमंडळ गटनेता निवडण्यापूर्वी महायुतीत पडद्यामागे बऱ्याच घडमोडी घडल्या आहेत. काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे तडकाफडकी साताऱ्यातील त्यांच्या गावी का गेले, याचाही उलगडा आता होऊ लागलेला आहे.
महायुती प्रचंड बहुमताने सत्तेत आल्यानंतर आपल्यालाच पुन्हा मुख्यमंत्री केले जावे, अशी शिंदे यांची इच्छा होती. दिल्लीत महायुतीच्या बैठकीत गृहमंत्री अमित शहा उपस्थित होते. या बैठकीत आपल्याला किमान सहा महिने मुख्यमंत्री केले जावे, अशी मागणी शिंदे यांनी केली होती. पण अशा प्रकारे सहा महिन्यासाठी मुख्यमंत्री केले गेले तर चुकीचा पायंडा पडेल शिवाय प्रशासनावरही त्याचा नकारात्मक परिणाम होईल, असे सांगत शहा यांनी ही मागणी फेटाळून लावली, असे टाइम्स ऑफ इंडियाच्या बातमीत म्हटले आहे.
विधानसभा निवडणुकीत महायुती सत्तेत आली, तर शिंदे यांना पुन्हा मुख्यमंत्री केले जाईल, असा शब्द भाजपने दिला होता, असाही दावा शिंदे यांचा होता. पण अमित शहा यांनी यास नकार दिला. "भाजपकडे जवळपास बहुमत होईल इतके संख्याबळ आहे. इतके संख्याबळ तुमच्याकडे असते तर तुम्ही मुख्यमंत्रिपद सोडले असते का? तुम्ही भाजपच्या दृष्टिकोनातून पाहा," असे शहा यांनी शिंदे यांना स्पष्ट स्वरूपात सांगितले.
त्यानंतर शिंदे यांच्याकडे फारसे काही सांगण्यासारखे नव्हते. त्यानंतर सरकार स्थापन्यात आपली कोणतीही आडकाठी येणार नाही आणि भाजप नेतृत्व जो निर्णय घेईल, तो आपल्यासाठी अंतिम असेल, असा शिंदे यांनी सांगितले. हा सगळा प्रकार २८ नोव्हेंबरला घडला. या बैठकीत फडणवीस, अजित पवार आणि प्रफुल्ल पटेल यांचीही उपस्थिती होते.
दिल्लीतील या बैठकीच्या दुसऱ्या दिवशी शिंदे साताऱ्यातील त्यांच्या गावी निघून गेले. रविवारी ते मुंबईत परत आले आणि पुन्हा भाजप नेतृत्व मुख्यमंत्रिपदाबद्दल जो निर्णय घेईल, तो मान्य असेल असे पुन्हा एकदा त्यांनी स्पष्ट केले.