नवी मुंबई : विधानसभा निवडणुकीनंतर राष्ट्रवादी पक्ष संपला असे बोलले जात आहे. पण कोणताही पक्ष कधी संपत नसतो, तो पुन्हा उभा राहतो. महानगरपालिकेच्या निवडणुका होणार असून आता पक्षात डॉक्टर, इंजिनिअर सारखे सुशिक्षित लोक असून भुरटे लोक पक्ष सोडून गेले, असे प्रतिपादन राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांनी केले. ऐरोलीमध्ये मशालीला घेऊन तुतारी वाजवा, असे आवाहनही त्यांनी केले.
ऐरोली सेक्टर 16 येथे आई फांऊडेशनच्या संकल्पनेतून व राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार गटाच्या माध्यमातून रविवारी महिला मेळावा आयोजित करण्यात आला होता. यावेळी ते बोलत होते. ते म्हणाले, सध्या देशात विमानांचा घोळ सुरु असून एका व्यक्तीच्या हातात यंत्रणा दिल्यामुळे काय होते याचा परिणाम इंडिगोच्या सेवेमुळे समोर येत आहे. देशातील एक-दोन मोठे उद्योजक अडचणीत आले, तर अक्खा देश अडचणीत येऊ शकतो, असे संकेत मागील काही वर्षांत येत असल्याचे ते म्हणाले. लाडक्या बहिणीच्या माध्यमातून बिहार, महाराष्ट्रात परिवर्तन झाले. पण एक दिवस सामान्य जनतेचे सरकार येईल व त्यासाठी पाया मजबूत असणे आवश्यक आहे. महिलांनी एक संधी द्यावी, असे आवाहन देखील त्यांनी केले. यावेळी राष्ट्रवादीचे नवी मुंबई जिल्हाध्यक्ष डॉ. मंगेश आमले, माजी नगरसेवक एम.के.मढवी, विनया मढवी उपस्थित होते.