

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या नेत्यांनी आपल्यावर नवीन जबाबदारी सोपवली असून पक्षाला सत्तेत आणण्यासाठी रात्रंदिवस आपण काम करू, असा निर्धार नवनियुक्त प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांनी केला आहे. प्रदेशाध्यक्षपदासाठी घोषणा झाल्यानंतर ते प्रसारमाध्यमांशी बोलत होते.
आमदार शिंदे म्हणाले, पक्ष संघटनेला अधिक भक्कम करण्यासोबतच पक्ष विस्तारासाठी राज्यभर सक्रियपणे काम करणार आहोत. गोरगरीब जनतेच्या हितासाठी कटिबद्ध राहण्याची ग्वाही देत लवकरच राज्यभर दौरा करणार असून आर. आर. पाटील यांच्याप्रमाणे आपण काम करणार आहोत.
पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार आणि पक्षाच्या सर्व वरिष्ठ नेत्यांनी, पदाधिकार्यांनी प्रदेशाध्यक्ष केल्याबद्दल मी मनापासून सर्वांचे आभार व्यक्त करतो. आपल्या सर्वांच्या वतीने महाराष्ट्राच्या जनतेला ग्वाही देऊ इच्छितो, ज्या नेत्याने गोर-गरीब जनतेसाठी अहोरात्र कष्ट केले, त्या नेत्यांच्या पक्षाचा एक कार्यकर्ता म्हणून राज्यातील अनेक प्रश्नांना आणि अन्यायाला वाचा फोडण्याचा प्रयत्न करेन.
पक्षातील अनेक दिग्गज नेते प्रदेशाध्यक्ष पदासाठी पात्र असताना मला मिळालेल्या संधीचा उपयोग लोकांच्या हितासाठी करेन. वेळ पडल्यास रस्त्यावर उतरून सरकारच्या विरोधात जनतेची जागृती करेन.
हल्ली सत्ताबदल हा आमिष दाखवून केला जातो. या बदललेल्या यंत्रणेला लोकांमध्ये जागृत करून, सर्वसामान्य जनतेसाठी काम करेन. महिन्याभरात राज्याचा दौरा करून पक्षसंघटना मजबूत करण्याचा प्रयत्न करेन. नवीन तरुणांना संधी देईन. सर्वधर्मीय तरुणांना एकत्र करून संघटना मजबूत करेन,असेही शिंदे म्हणाले.