

मुंबई : शारदीय नवरात्रोत्सवास सोमवारपासून सुरूवात झाली असून आदिशक्तीच्या जागरासाठी मुंबापुरी सज्ज झाली आहे. मंदिरे, सार्वजनिक मंडळ आणि घरोघरी प्रथेनुसार विधिवत घटस्थापना करण्यात आली. मुंबईच्या महालक्ष्मी मंदिरामध्ये घटस्थापना करून तर मुंबादेवी मंदिरात मंगल आरती करुन मंदिर भाविकांना दर्शनासाठी खुले करण्यात आले.
नवरात्रोत्सवात घरोघरी वा मंडपात देवीची घटस्थापना करून अखंड नंदादीप ठेवून, फुलांची आरास, देवाचा पाठ आणि जागरण केले जाते. महालक्ष्मी मंदिरात घटस्थापना करून मंदिर दर्शनासाठी खुले करण्यात आले असून शुक्रवारी 26 सप्टेंबर रोजी ललिता पंचमी पूजन असून त्या दिवशी उपांग ललिता व्रत आहे. मंगळवारी 30 सप्टेंबर रोजी दुर्गा अष्टमी असून अष्टमी हवनास दुपारी अडीच वाजता सुरूवात होऊन सायंकाळी सहा वाजता पूर्णाहुती देऊन आरती करण्यात येणार आहे.
मुंबादेवी मंदिरात पहाटे 5:30 वाजता मंगल आरती करुन मंदिर भाविकांना दर्शनासाठी खुले करण्यात आले. सकाळी 7 ते 8 वाजता घटस्थापना करण्यात आली. संपूर्ण नवरात्र काळात 21 विशेष पुजार्यांमार्फत चंडीपाठ केला जाणार आहे. भाविकांच्या सुरक्षिततेसाठी बॅग स्कॅनर, सीसीटीव्ही कॅमेरे आणि 150 स्वयंसेवकांचे पथक मदतीसाठी सज्ज ठेवण्यात आले आहे.
सार्वजनिक मंडळांमध्ये दुर्गामातेची प्रतिष्ठापना करण्यात आली. लालबाग, उमरखाडी, दगडी चाळ येथील मंडळांसह दक्षिण मुंबईतील अनेक मंडळे तसेच अंधेरी, मालाड, बोरिवली यांसारख्या उपनगरांमध्ये दुर्गामातेची प्रतिष्ठापना करण्यात आली.
नऊ दिवसांच्या व्रतास आरंभ
नवरात्रोत्सवात अनेक भाविक देवीचा जागर, उपासना करण्यासाठी उपवास करतात. घटस्थापानेपासून पुढील नऊ दिवस उपवास करतात. यामध्ये काहींचा निर्जळी उपवास असतो, तर काहीजण केवळ घट उठता बसता म्हणजे अश्विन शुक्ल प्रतिपदा आणि अष्टमी, नवमी याच दिवशी उपवास करतात. उपवास आपल्या प्रथा परंपरेनुसार सोडले जातात. काही नऊ दिवस अनवाणी चालतात.महालक्ष्मी, मुंबादेवी, गावदेवीच्या मंदिरामध्ये दर्शन घेऊन अनेक भाविकांनी उपवासाला सुरूवात केली.
नऊ दिवसांदरम्यानच्या विविध उपक्रम राबविण्यात येणार आहेत. नवरात्रोत्सवानिमित्त रासदांडियाचे विशेष आकर्षण असते. विशेषत: तरुणाईकडून यासाठी विशेष तयारी केली जात असून भव्य गरब्याचे आयोजनही केले आहे.