

पुढारी ऑनलाईन डेस्क : क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जन्म गावी नायगाव येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत ७ ते ८ मंत्री होते. हा नियमित कार्यक्रम होता. त्याच दिवशी चाकण मध्ये महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे उद्घाटन होत. तिथे ज्येष्ठ नेते शरद पवार उपस्थित होते. या भेटीत फुले- शाहू- आंबेडकर यांच्यावर चर्चा झाली, पण राजकीय चर्चा झाली नाही, असे राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी आज (दि.६) पत्रकार परिषदेत स्पष्ट केले.
ते पुढे म्हणाले की, बीड प्रकरणात जे कोणी दोषी असतील, त्यांच्यावर कारवाई करा. आरोप सिद्ध झाले नसताना कुणाच्याही राजीनाम्याची मागणी करणे चुकीचे आहे. कारण नसताना कोणावरही अन्याय होता कामा नये. चौकशीत मंत्री धनंजय मुंडेंचे काही समोर आले आहे का? मग त्यांचा राजीनामा का मागता ? चौकशी केल्यानंतर जे कुणी दोषी असतील त्यांच्यावर कारवाई करण्याचे मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले आहे. कुणाचा तरी बळी देऊन मला मंत्रीपद मिळावे, असे मला स्वप्नात सुद्धा वाटत नाही, असे त्यांनी (Chhagan Bhujbal) यावेळी सांगितले.
मला मंत्री व्हायचं म्हणून मी कोणाचा बळी घ्या, असे माझ्या स्वप्नातही नाही. यामध्ये जे दोषी सापडतील, त्यांच्यावर कारवाई करू. त्या अगोदर आपण मुंडे यांचा राजीनामा का मागत आहत? तुमच्या कडे काही असेल, तर पोलिसांना द्या. त्यांचा हात त्यामध्ये आहे, हे स्पष्ट होत नाही, तो पर्यंत त्यांनी का राजीनामा द्यावा?, असा सवाल करून अशा प्रकरणातून मी गेलो आहे. तेलगी प्रकरणात माझा राजीनामा घेतला होता. त्यावेळी मी उपमुख्यमंत्री, गृहमंत्री होतो. ती केस मी CBI कडे नेली आणि संपूर्ण चौकशी केली. मी भोगलं आहे. कारण नसताना एकदम राजीनामा घेऊन राजीनामा मागणे, मला योग्य वाटत नाही. दोषी असेल तर मुख्यमंत्री बोलावून राजीनामा घेतील. दोषीला शिक्षा झाली पाहिजे. आमदार धस ज्या प्रकारे सांगतात त्यामुळे अंगावर शहारे येतात. मनोज जरांगे यांच्याबद्दल बोलले, तर 4 -5 वेळेस मुंडे त्यांचे उपोषण सोडवायला गेले होते. त्यामुळे ते दोघे बघून घेतील, असे ते म्हणाले.