

मुंबई : महाराष्ट्र व गोवा सीमेला जोडणार्या महाराष्ट्र शक्तिपीठ महामार्गाला गती देण्यासाठी कोट्यवधी रुपयांच्या निधीला मंजुरी दिल्यानंतर कोल्हापूरचे प्रतिनिधित्व करणारे मंत्रिमंडळातील दोन मंत्री प्रकाश आबिटकर व हसन मुश्रीफ यांच्या नाराजीचे पडसाद मंत्रिमंडळ बैठकीत उमटले. या मार्गाबाबत कोल्हापूरवासीयांचे काय म्हणणे आहे ते ऐकून घ्या, अशा भावना त्यांनी मुख्यमंत्र्यांसमोर मांडल्या. दरम्यान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस लवकरच त्यांना वेळ देऊन त्यांचे म्हणणे ऐकून घेणार असल्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितले.
शक्तिपीठ मार्गाला सांगली व कोल्हापूरमधील शेतकर्यांचा प्रचंड विरोध आहे. मात्र शेतकर्यांच्या विरोधाला न जुमानता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंत्रिमंडळाच्या बैठकीत भूसंपादनासाठी 20 हजार 787 कोटी रुपयांच्या तरतुदीस मान्यता दिली. शक्तिपीठ महामार्गामुळे लोकसभा व विधानसभा निवडणुकीत मोठा फटका बसल्याने शेतकर्यांना विश्वासात घेऊन निर्णय व्हावा, असे मत मंत्री प्रकाश आबिटकर व हसन मुश्रीफ यांनी यावेळी मांडल्याचे समजते.
मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी माध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी या दोन मंत्र्यांच्या नाराजीबाबत विचारले असता ते म्हणाले, मंत्री आबिटकर व मुश्रीफ हे कोल्हापूरचे प्रतिनिधित्व करतात. त्यामुळे कोल्हापूरवासीयांचे काय म्हणणे आहे हे ऐकून घ्यावे, त्यासाठी आम्हाला वेळ द्यावा, असे त्यांचे म्हणणे होते. परंतु, मुख्यमंत्री फडणवीस यांनी त्यांना सकारात्मक प्रतिसाद देत आम्ही तिघेही (मुख्यमंत्री व दोन उपमुख्यमंत्री) तुम्हाला वेळ देऊन तुमचे म्हणणे ऐकून घेऊ, असे आश्वासन दिले आहे. लोकांचा विरोध असेल तर तेथे करण्याचे काहीच कारण नाही. त्यासंदर्भात मार्ग बदलण्याचाही प्रयत्न केला जाईल, असेही त्यांनी सांगितल्याचे पवार यांनी स्पष्ट केले.