

मुंबई : मराठवाडा आणि संबंधित भागातील दुष्काळी पट्ट्याचे चित्र बदलायचे असेल तर शक्तिपीठ महामार्ग हे त्याला उत्तर आहे. हा केवळ महामार्ग नसून, या महामार्गावर प्रत्येक शंभर किलोमीटरमध्ये 500 ते 1000 शेततळी उभारण्याचा आमचा प्रयत्न आहे. तसेच जितके नाले लागतील त्यावर बंधारे असणारे पूल उभारले जातील. त्यातून पाणी अडविण्याचे काम होणार आहे. त्यामुळे दुष्काळी भागात शक्तिपीठ महामार्गाच्या माध्यमातून जल संवर्धन आणि जल पुनर्भरणाचे काम होणार आहे. तसेच याचा उपयोग करून मोठ्या प्रमाणावर हरित ऊर्जा तयार केली जाणार आहे. शक्तिपीठ महामार्ग हा मराठवाडा आणि दुष्काळी भागाचे चित्र पूर्णपणे बदलणारा महामार्ग ठरेल, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गुरुवारी व्यक्त केला.
शक्तिपीठ महामार्गासाठी राज्य सरकार 12 हजार कोटींचे कर्ज घेणार आहे. त्यामुळे कर्जाचा बोजा वाढणार असून, वित्त विभागानेही याला आक्षेप घेतल्याचा आरोप विरोधी पक्षांकडून केला जात आहे. या सर्व आक्षेपांना मुख्यमंत्र्यांनी उत्तर दिले. वित्त विभागाने असा कोणताही आक्षेप घेतलेला नाही. वित्तीय बाबी निदर्शनास आणून देणे हेच वित्त विभागाचे काम असते. वित्त विभागाने आक्षेप घेतला वगैरे म्हणता येणार नाही.