मुंबई : अमेरिकेने भारतावर अतिरिक्त टक्क्यांचा टॅरिफ लादण्याची घोषणा केल्यानंतर भारतीय शेअर बाजारावर चिंतेचे सावट असताना गुरुवारी निर्देशांकाचा वारू वेगाने दौडू लागल्याने गुंतवणूकदारांना दिलासा मिळाला.
साप्ताहिक वायदापूर्तीच्या दिवशी भारतीय शेअर बाजारात गुंतवणूकदारांनी एक नाट्यमय चढ-उतार अनुभवला. सुरुवातीच्या सत्रात झालेल्या मोठ्या घसरणीनंतर शेवटच्या तासात झालेल्या जोरदार खरेदीमुळे बाजाराने सर्व नुकसान भरून काढले आणि अखेरीस ग्रीन झोनमध्ये बंद झाले. भारत आणि अमेरिका यांच्यात व्यापार वाटाघाटी पुन्हा सुरू होण्याची आशा निर्माण झाल्याने गुंतवणूकदारांचा आत्मविश्वास वाढला. सेन्सेक्स, जो दिवसाच्या कामकाजादरम्यान 719.38 अंकांनी घसरून 79,824.61 या नीचांकी पातळीवर पोहोचला होता, त्याने नंतर दिवसाच्या नीचांकी पातळीवरून 700 हून अधिक अंकांची नेत्रदीपक सुधारणा नोंदवली आणि 80,623.26 वर स्थिरावला. निफ्टीनेही 220.80 अंकांची घसरण अनुभवल्यानंतर 24,500 ची महत्त्वपूर्ण पातळी पुन्हा गाठली. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारताकडून रशियन तेलाची आयात सुरूच राहिल्याने भारतीय वस्तूंवरील आयात शुल्क 50 टक्क्यांपर्यंत वाढवण्याची घोषणा केली होती. या वृत्ताने सुरुवातीला बाजारात चिंतेचे वातावरण निर्माण झाले. मात्र तज्ज्ञांच्या मते दोन्ही देशांमध्ये वाटाघाटींसाठी अजूनही संधी उपलब्ध आहे. त्यामुळे बाजाराला मोठा आधार मिळाला.
स्वस्तिक इन्व्हेस्टमार्टचे संशोधन प्रमुख संतोष मीना यांनी सांगितले की, यामध्ये कोणतेही मोठे नकारात्मक आश्चर्य नाही. वाटाघाटींसाठी अजूनही 20 दिवसांची मुदत आहे आणि 24 ऑगस्ट रोजी अमेरिकेचे एक व्यापारी शिष्टमंडळ भारत दौर्यावर येण्याची शक्यता आहे. याच कारणामुळे बाजारातील घसरण थांबली. जिओजित इन्व्हेस्टमेंटस् लिमिटेडचे संशोधन प्रमुख विनोद नायर यांनी नमूद केले की, अमेरिकेच्या शुल्कवाढीच्या घोषणेमुळे सुरुवातीला बाजारावर दबाव होता. पण दिवसाच्या अखेरीस आंतरराष्ट्रीय स्तरावर शांतता चर्चेची शक्यता निर्माण झाल्याने आणि अमेरिकेच्या भूमिकेत नरमाई येण्याच्या आशेने बाजाराचे वातावरण सुधारले. एकंदरीत सुरुवातीच्या धक्क्यानंतर बाजाराने दाखवलेली लवचिकता गुंतवणूकदारांचा वाढलेला आत्मविश्वास दर्शवते. आगामी काळात जागतिक घडामोडी आणि व्यापार वाटाघाटींवर बाजाराची पुढील दिशा अवलंबून असेल.

