

मुंबई : युद्ध संपवण्यासाठी सुरू असलेल्या इराणसोबतच्या करारासाठी वाटाघाटींमध्ये प्रगती झाल्याचा दावा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केल्यानंतर, खनिज तेलाच्या किमतीत मोठी घसरण झाली. या पार्श्वभूमीवर, बुधवारी प्रमुख निर्देशांक सेन्सेक्सने 940 अंकांची उसळी घेतली.
दिवसाच्या अखेरीस गुंतवणूकदारांनी लावलेल्या खरेदीच्या सपाट्याने सेन्सेक्स 940.73 अंकांनी (1.22 टक्के) वधारला आणि 77,958.52 या पातळीवर स्थिरावला. सत्रादरम्यान, सेन्सेक्समध्ये 1,004.99 अंकांची कमाई करत 78,022.78 या उच्चांकी पातळीला स्पर्श केला. निफ्टी 298.15 अंकांनी (1.24 टक्के) वधारून 24,330.95 या पातळीवर बंद झाला.
तेलाचे दर घसरले
जागतिक तेल बाजाराचा मापदंड मानले जाणारे ब्रेंट क्रूड 8 टक्क्यांनी घसरून 101.1 अमेरिकी डॉलर्स प्रतिबॅरल या पातळीवर आले आहे. अमेरिका आणि इराण यांच्यात शांतता करार होण्याची शक्यता निर्माण झाल्यामुळे जागतिक पातळीवर आशावाद निर्माण झाला आहे. परिणामी, खनिज तेलाचे दर 100 डॉलर्स प्रतिबॅरलपर्यंत खाली आले आहेत.