

मुंबई ः शेअर बाजाराची नियामक संस्था असलेल्या सिक्युरिटी एक्स्चेंज बोर्ड ऑफ इंडिया (सेबी) ने अमेरिकेतील बडी गुंतवणूक संस्था जेन स्ट्रीट ग्रुपला शेअर बाजारात व्यवहार करण्यास मनाई केली आहे.
शेअर बाजारात बेकायदेशीर पद्धतीने नफा कमावल्याचा ठपका ठेवत ‘सेबी’ने संस्थेच्या बँक खात्यातील 4,840 कोटी रुपये गोठवण्याचा आदेश दिला आहे.
जेन स्ट्रीट अमेरिकेतील बडी गुंतवणूक संस्था आहे. शेअर बाजारात चुकीच्या पद्धतीने हस्तक्षेप करीत अमाप नफा कमावल्याचा ठपका ‘सेबी’ने ठेवला आहे. शेअरशी निगडित असलेल्या वायदे बाजारातील काही व्यवहार संशयास्पद आढळले आहेत. निफ्टी-50 निर्देशांकाशी निगडित व्यवहारातून कंपनीने चुकीच्या पद्धतीचा अवलंब करत नफा कमावल्याचे ‘सेबी’चे म्हणणे आहे. जेन स्ट्रीटला पुढील आदेशापर्यंत शेअर बाजारात शेअर विकता अथवा खरेदी करता येणार नाहीत.
पूर्वपरवानगीशिवाय जेन स्ट्रीटच्या बँक खात्यातून पैसे काढण्याची परवानगी देऊ नये, अशी सूचना ‘सेबी’ने संबंधित बँकांना दिली आहे. दरम्यान, जेन स्ट्रीटने आम्ही कोणताही चुकीचा व्यवहार केला नसल्याचे सांगितले आहे. आम्ही ‘सेबी’ला याप्रकरणी पूर्ण सहकार्य करत असल्याचेही जेन स्ट्रीटने म्हटले आहे.
‘सेबी’ने दिलेल्या माहितीनुसार, जानेवारी 2023 ते मार्च 2025 दरम्यान जेन स्ट्रीटने सुमारे 36,500 कोटी रुपयांचा नफा कमावला आहे. इंडेक्स ऑप्शन्समधून 43,289 कोटी रुपये कमावले असल्याचे नॅशनल स्टॉक एक्स्चेंजच्या आडकेवारीवरून दिसून येत आहे. संस्थेने बेकायदेशीर 4,840 कोटी रुपये कमावले असल्याने तितकी रक्कम गोठवण्याचे निर्देश ‘सेबी’ने दिले आहेत.
कभी कभी कुछ जितने के लिए कुछ हारना भी पडता है. और हार कर जितने वाले को बाजीगर कहते है... हा किंग खान शाहरुखचा डायलॉग बॉलीवूडमध्ये आजरामर असला तरी भारतीय शेअर बाजारात नफा कमवण्यासाठी आधी तोटा मुद्दाम सहन करणार्या जेन स्ट्रीट कंपनीलाही तो लागू होतो. या कंपनीने वायदेबाजारात मुद्दाम 7 हजार 208 कोटी रुपये गमावले आणि प्रत्यक्षात कमावले 43 हजार 289 कोटी 33 लाख रुपये. म्हणजे एक अब्ज डॉलर्स गमावले आणि 5 अब्ज डॉलर्सचा नफा कमावला तो वायदे बाजारातील या बाजीगर स्टाईल व्यवहारातून.