

मुंबई : मंगळवारी मध्यरात्रीपासून महाराष्ट्र राज्य ट्रक टेम्पो टँकर्स बस वाहतूक संघाच्या नेतृत्वाखाली सर्व वाहतूकदारांनी मध्यरात्रीपासून चक्काजाम आंदोलन छेडले असतानाच राज्यभरातील स्कूल बस मालकांनी बुधवारी 2 जुलैपासून अनिश्चित काळासाठी संपावर जाण्याची घोषणा केली आहे.
स्कूल बस संपाने, शाळेत जाणार्या मुलांचे हाल होण्याची शक्यता आहे. वाहतूक पोलिसांकडून बसचालकांवर होणारी अकारण कारवाई, सीसीटीव्ही, वेबरेडर व जीपीएस यांसारख्या सुविधांसाठी ई-चालानद्वारे होणारी दंडात्मक कारवाई, तसेच परवानग्यांसाठी होणारी अडवणूक या विरोधात शाळा बस ओनर्स असोसिएशनने या संपाची हाक दिली आहे.
स्कूल बसप्रमाणेच माल वाहतूकदारांचाही मंगळवारी मध्यरात्रीपासून सुरू होणारा संप हा खासकरून परिवहन विभाग आणि पोलिसांकडून होणारी पिळवणूक, अडवणूक विरोधात आहे. वाहतूकदारांकडून वसूल करण्यात येणारा ऑनलाईन दंड , दंडाची रक्कम कमी करणे, थकीत दंड माफ करणे, क्लिनरची सक्ती रद्द करणे, व्यावसायिक वाहनांची प्रवेश वेळेचा पुनर्विचार करणे, वाहनतळाची व्यवस्था करणे या सहा प्रमुख मागण्यांसह प्रलंबित मागण्यांसाठी महाराष्ट्र राज्य ट्रक टेम्पो टँकर्स बस वाहतूक संघाच्या नेतृत्वाखाली 1 जुलैच्या मध्यरात्रीपासून चक्का जाम आंदोलन पुकारले आहे.
वारंवार सरकारकडे तक्रारही केल्या आहेत. मात्र चालकांचा त्रास काही कमी झाला नाही. याविरोधात आझाद मैदानात बेमुदत उपोषणही करण्यात आले. मात्र याचीही दखल सरकारने घेतली नाही. त्यामुळे 1 जुलैच्या मध्यरात्रीपासून राज्यभरात चक्का जाम आंदोलन पुकारले आहे. हा निर्णय सर्व वाहतूक संघटनांनी घेतला असून राज्यभरातील सर्व वाहतूकदार सहभागी होणार असल्याचे महासंघाचे अध्यक्ष प्रकाश गवळी यांनी सांगितले.
सर्व शैक्षणिक संस्थांनी तात्पुरते ऑनलाईन वर्ग घेण्याचा विचार करावा किंवा वेळापत्रकात बदल करावा. संप मिटेपर्यंत पालकांनी मुलांसाठी पर्यायी वाहतूक व्यवस्था करावी, असे स्कूल बस मालक संघटनेचे अध्यक्ष अनिल गर्ग यांनी म्हटले आहे.