Sawantwadi Railway Station : सावंतवाडी रेल्वे स्थानकाला मधू दंडवते यांचे नाव

शासकीय कर्मचाऱ्यांच्या बदल्यांना मुदतवाढ
Sawantwadi Railway Station : सावंतवाडी रेल्वे स्थानकाला मधू दंडवते यांचे नाव
Published on
Updated on

मुंबई : कोकण रेल्वेचे शिल्पकार आणि माजी रेल्वे मंत्री मधू दंडवते यांचे नाव सावंतवाडी रेल्वे स्थानकाला देण्याच्या प्रस्तावाला मंगळवारी राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजुरी देण्यात आली. या निर्णयानुसार आता सावंतवाडी रेल्वे स्थानकाचे नाव ‌‘लोकमान्य मधू दंडवते रेल्वे टर्मिनस‌’ असे होणार आहे. यामुळे कोकणातील जनतेची अनेक वर्षांची मागणी मार्गी लागली आहे. नामकरणाबाबतचा हा अंतिम प्रस्ताव मंजुरीसाठी केंद्र सरकारकडे पाठविण्यात येणार आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली मंगळवारी झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत गृह, परिवहन, सामान्य प्रशासन आणि उद्योग विभागाशी संबंधित महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले. रेल्वेमंत्री व केंद्रीय अर्थमंत्री राहिलेले ज्येष्ठ नेते मधू दंडवते यांना कोकण रेल्वेचे शिल्पकार म्हटले जाते. कोकण रेल्वे प्रकल्प प्रत्यक्षात यावा, यासाठी त्यांचे मोठे योगदान आहे. त्यांनी कोकणच्या रेल्वे प्रश्नांवर सातत्याने पाठपुरावा केला होता. त्यांच्या दूरदृष्टीमुळे कोकण रेल्वे सुरू झाली. त्यामुळे त्यांचे नाव कोकण रेल्वेमार्गावरील महत्त्वाच्या अशा सावंतवाडी रेल्वे स्थानकाला देण्यात यावे, अशी मागणी गेली काही वर्षे केली जात आहे.

या लोकभावनेची दखल घेऊन सावंतवाडी रेल्वे स्थानकाला ‌‘लोकमान्य मधू दंडवते रेल्वे टर्मिनस‌’ असे नाव देण्याचा निर्णय घेण्यात आला. या नामकरणाबाबत केंद्र सरकारच्या गृह व रेल्वे मंत्रालयाकडे प्रस्ताव सादर करण्यास मंजुरी देण्यात आली.

जनगणनेमुळे बदल्यांना मुदतवाढ

देशात सुरू असलेल्या जनगणना 2027 च्या पार्श्वभूमीवर राज्य शासकीय कर्मचाऱ्यांच्या 2026 मधील सर्वसाधारण बदल्यांना मुदतवाढ देण्यास मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली. त्यानुसार आता शासनाला 30 जून 2026 पर्यंत बदली प्रक्रिया राबविता येणार आहे. यासाठी महाराष्ट्र शासकीय कर्मचाऱ्यांच्या बदल्यांचे नियमन आणि शासकीय कर्तव्ये पार पाडताना होणाऱ्या विलंबास प्रतिबंध अधिनियम 2005 मध्ये सुधारणा करण्यात येणार आहे. त्याबाबतच्या मसुद्यासही मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजुरी देण्यात आली.

बदल्या करू नका; केंद्राचे आदेश

दरवर्षी एप्रिल-मे महिन्यात शासकीय कर्मचाऱ्यांच्या सर्वसाधारण बदल्या केल्या जातात. मात्र देशात जनगणनेचा पहिला टप्पा सुरू असून त्यामध्ये घर यादी तयार करणे व घर गणना केली जात आहे. हे काम 16 मे ते 14 जून 2026 या कालावधीत करण्यात येणार आहे. जनगणनेच्या कामासाठी नियुक्त कर्मचाऱ्यांच्या बदल्या करण्यात येऊ नये, असे निर्देश केंद्र सरकारने दिले आहेत. त्यामुळे या कामासाठी नियुक्त शासकीय कर्मचाऱ्यांच्या सर्वसाधारण बदल्यांना 30 जून 2026 पर्यंत मुदतवाढ द्यावी लागणार आहे.

डोंबिवलीतील पिंपळेश्वर देवस्थान अतिक्रमण नियमानुकूल

डोंबिवली औद्योगिक क्षेत्रातील मौजे सागाव सोनारपाडा येथील पिंपळेश्वर देवस्थान मंदिर ट्रस्टला अतिक्रमण नियमानुकूल करून चार एकर 25 गुंठे जमीन देण्याचा निर्णय मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला. मात्र यापुढे एमआयडीसीच्या संपादित जागेवरील अतिक्रमण काढून टाकणे किंवा नियमित करणे, स्थलांतरित करणे आदी बाबींसाठी एमआयडीसीने धोरण तयार करावे आणि त्यानुसार कार्यवाही करावी, अशा सूचनाही देण्यात आल्या. तसेच पिंपळेश्वर देवस्थानला अतिक्रमण नियमानुकूल करून दिलेली जमिनीचा पुर्व उदाहरण संदर्भ म्हणून वापर करता येणार नाही, असेही मंत्रिमंडळाने स्पष्ट केले आहे.

सागाव-सोनारपाडा येथील पिंपळेश्वर देवस्थान मंदिर ट्रस्टच्या वापरात असलेली जागा संस्थेला सामाजिक कार्यासाठी नाममात्र देण्याची विनंती करण्यात आली होती. याबाबत एमआयडीसीने राज्य सरकारकडे ठरावाद्वारे माहिती सादर केली होती. त्यावर गृह विभागाचे निर्णय आणि शासनाचे धोरण तसेच कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या समितीने तसेच राज्यस्तरीय समितीने शिफारस केल्यानुसार या प्रस्तावाला मान्यता देण्यात आली. पिंपळेश्वर देवस्थान मंदिर ट्रस्टला चार एकर 25 गुंठेवरील अतिक्रमण नियमानुकूल करून ही जमीन नाममात्र दराने दिली जाईल.

नागपूर बाह्य वळण रस्ता प्रकल्पासाठी मुद्रांक शुल्क माफ

‌‘नवीन नागपूर‌’ आणि ‌‘नवीन बाह्य वळण रस्ता‌’ प्रकल्पासाठी नागपूर जिल्ह्यातील हिंगणा तालुक्यातील मौजे गोदणी आणि मौजे लाडगाव (रीठी) येथील खावगी जमीन मालकांशी वाटाघाटी करून थेट खरेदी केली जाणार आहे. या थेट खरेदीच्या व्यवहारांवर आकारले जाणारे मुद्रांक शुल्क आणि नोंदणी शुल्क पूर्णपणे माफ करण्यास मंत्रिमंडळाने मान्यता दिली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news