

मुंबई : राज्यात आता उपग्रहाच्या मदतीने मृदसंधारण व जलसंधारण कामांची प्रत्यक्ष स्थळ पडताळणी (ग्राऊंड टूथिंग) केली जाणार आहे. यासाठी नागपूर येथील महाराष्ट्र सुदूर संवेदन उपयोजन केंद्र (एमआरसॅक) आणि मृद व जलसंधारण विभाग यांच्या सहकायनि मोबाईल अॅप व वेब पोर्टल विकसित करण्यात येणार आहे.
मृद व जलसंधारण मंत्री संजय राठोड यांनी माध्यमांशी बोलताना ही माहिती दिली. यासंदर्भातील शासन निर्णय जारी करण्यात आला असल्याचेही त्यांनी सांगितले. यामुळे मृदसंधारण व जलसंधारण क्षेत्रातील पारदर्शकता वाढणार असून, भविष्यातील जलसंधारण धोरणांसाठी अचूक माहिती मिळणार आहे, असे राठोड म्हणाले. यापूर्वी कृषी विभाग, जलसंधारण विभाग, जिल्हा परिषद, वन विभाग, रोजगार हमी विभाग, भूजल सर्वेक्षण विकास यंत्रणा आणि स्वयंसेवी संस्थांच्या माध्यमातून विविध योजनांअंतर्गत मोठ्या प्रमाणात मृदसंधारण व जलसंधारण कामे करण्यात आली. या कामांच्या डिजिटल नोंदणी आणि पडताळणी होण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा उपयोग करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यासाठी एक विशेष मोहीम राबविण्यात येणार असून गावपातळीवर शिवार फेरीद्वारे प्रत्यक्ष स्थळ पाहणी करण्यात येणार आहे. स्थानिक प्रशासन व ग्रामस्थांच्या सहकार्याने संरचनांची पडताळणीही केली जाणार आहे. मोबाईल अॅपद्वारे थेट डिजिटल नोंदणी करण्यात येणार आहे.
या नोंदणीसाठीच विशेष मोबाईल अॅप विकसित केले जाणार आहे. केवळ नियुक्त अधिकारी व कर्मचाऱ्यांनाच या अॅपचा वापर करता येणार आहे. या अॅपमध्ये जिल्हानिहाय, तालुकानिहाय व गावनिहाय स्थळ पाहणीची डिजिटल माहिती नोंदवली जाणार आहे. विशेष म्हणजे स्थळ नोंदणी व पडताळणीसाठी उपग्रह आधारित जिओफेन्स हे तंत्रज्ञानही वापरले जाणार आहे.
• नागपूर यांच्याकडील नोंदींची पडताळणी उपग्रह इमेजरीच्या आधारे मृदसंधारण व जलसंधारण संरचनांचे मॅपिंग करून त्या संरचनांची प्रत्यक्ष पाहणी करणे.
• नवीन संरचनांची नोंदणी शिवार फेऱ्यांद्वारे अद्याप नोंद न झालेल्या व सध्या सुरू असलेल्या मृद व जलसंधारणाशी संबंधित नवीन संरचनांची माहिती गोळा करणे.
• संरचनांचे व्यवस्थापन व सुधारणा मृद व जलसंधारणाशी संबंधित संरचना दुरुस्ती, नवीन संरचना बांधणी, नाला खोलीकरण, गाळ काढण्यासंबंधी माहिती मोबाईल अॅपद्वारे नोंदवणे.