

मुंबई : सध्या उद्धव ठाकरेंचे नवे आराध्य दैवत औरंगजेब झाला आहे. लवकरच छत्रपती शिवाजी महाराज आणि शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या फोटोजवळ औरंगजेबचा फोटो ते मातोश्रीवर लावतील, अशी खोचक टीका शिवसेना शिंदे गटाचे नेते संजय निरुपम यांनी केली आहे.
पत्रकार परिषदेत ते म्हणाले, ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे छत्रपती शिवरायांचा फोटोसुद्धा काढून टाकतील. त्यांच्या पक्षात जे काही चालले आहे, त्याचा मी निषेध करतो. सध्या संजय राऊत हे औरंगजेब आणि नागपूर दंगलीवर ज्याप्रमाणे मुस्लिम समाजाची तळी उचलून धरत आहेत ते पहिल्यावर मला पश्चिम बंगालमधील ममता बॅनर्जी यांची आठवण होते. त्यांनीही मुस्लिम मतांसाठी लांगूलचालन केले. तशीच भूमिका आता संजय राऊत घेत आहेत. दरम्यान, दिशा सालियानचा मृत्यू प्रकरणाची चौकशी झाली पाहिजे. या प्रकरणात जे लोक अडकले असतील त्यांच्यापैकी कोणालाही सोडू नये. दिशावर सामूहिक बलात्कार झाला, असा गंभीर आरोप तिच्या वडिलांनी केला आहे. यामागे कोण आहे, याची कसून चौकशी व्हावी, असे निरुपम म्हणाले.