

मुंबई : मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी नवाब मलिक यांना भाजपचा विरोध असल्यामुळे त्यांच्या ऐवजी कन्या आमदार सना मलिक यांच्याकडे राष्ट्रवादी काँग्रेस निवडणूक प्रचाराची सूत्रे देणार असल्याचे समजते.
दाऊद इब्राहिमशी संबंधित असलेल्या व्यक्तीसोबत नवाब मलिक यांनी जमिनीचा व्यवहार केल्याप्रकरणी मलिक तुरुंगात होते. सध्या ते वैद्यकीय जामिनावर आहेत. पोलिस कारवाई होण्यापूर्वी नवाब मलिक यांनी भाजपच्या नेत्यांवर टीका केली होती. या टीकेची दखल घेऊन भाजपच्या नेत्यांनी मलिक यांची कोंडी केली आहे. मलिक यांच्याकडे राष्ट्रवादीने मुंबई महापालिका निवडणूक प्रचाराची सूत्रे दिल्यास भाजपने युती न करण्याचा इशारा दिला आहे. राज्य सरकारमध्येही राष्ट्रवादी काँग्रेस सहभागी आहे. अशा परिस्थितीत मलिक यांच्यासाठी हट्ट धरणे राष्ट्रवादीला राजकीयदृष्ट्या सोयीचे नाही.
मलिक यांनी दिला अजित पवारांकडे अहवाल
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या देवगिरी या शासकीय निवासस्थानी बुधवारी सकाळी नवाब मलिक यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचा निवडणूक अहवाल सोपविला. राष्ट्रवादी काँग्रेसने कोणत्या वार्डमधून निवडणूक लढल्यास हमखास विजय होईल, याची माहिती मलिक यांनी उपमुख्यमंत्री पवार यांना या भेटीत दिल्याचे समजते.