

मुंबई : राज्य सरकारने वडाळ्यातील २०,००० चौरस मीटर मिठागराची जमीन ही निवासी क्षेत्र म्हणून पुनर्वर्गीकृत करण्याचा निर्णय घेतला आहे. दोन्ही भूखंडांवर आयएएस ऑफिसर्स असोसिएशनसाठी जिमखाना आणि ईव्हीएम-व्हीव्हीपीएटी मशीन्ससाठी गोदामे बांधली जाणार आहेत.
राज्य सरकारने दोन मिठागर जमिनींचे एनए किंवा नैसर्गिक क्षेत्रामधून आर झोन किंवा निवासी क्षेत्राच्या जमिनीत रूपांतर करण्याबाबत एक सूचना शनिवारी प्रकाशित केली. म्हणजेच तिथे यापुढे निवासी बांधकाम करता येईल. ही जमीन टेकड्या किंवा खारफुटींनी व्यापलेली नाही आणि मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेडकडून (एमएमआरसीएल) आधीच तात्पुरती वापरली जात आहे.
काही दशकांपूर्वी मिठागर जमीन म्हणून घोषित असलेल्या आणि तेव्हापासून रिकाम्या पडलेल्या भूखंडापैकी ६,४७५ चौरस मीटर जमिनीवर ईव्हीएमसाठीचे गोदाम बांधले जाईल. तसेच प्रशासकीय सेवेतील म्हणजेच आयएएस अधिकाऱ्यांच्या जिमखान्यासाठी आणखी १३,८४३.८२ चौरस मीटर जागा देण्याचा निर्णय राज्य सरकाने घेतला आहे. अशा रीतीने मिठागराची २०, ३१८.८२ चौरस मीटर जागा आरक्षणमुक्त करून बांधकामासाठी वापरली जाईल.
गेल्या ऑक्टोबरमध्ये, मुंबई शहरच्या जिल्हाधिकाऱ्यांनी महसूल विभागाला एक पत्र पाठवून दोन्ही भूखंड एनए झोनिंगमधून वगळण्याची आणि सार्वजनिक वापरासाठी उपलब्ध करून देण्याची विनंती केली होती. जमिनीच्या काही भागांवर आधीच काही बांधकामे आहेत.
पूर्वी, ईव्हीएम, अन्नधान्य गोदामे ही मुंबई बंदर प्राधिकरण आणि रेल्वे कार्यालयांच्या निवडक विभागांमध्ये तसेच शाळा आणि अशा इतर ठिकाणी साठवले जात होते. परंतु, राज्याच्या मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांच्या कार्यालयाने आता ईव्हीएम-व्हीव्हीपीएटीएससाठी समर्पित गोदामे बांधण्याचा निर्णय घेतला आहे. त्यांनी महाराष्ट्रातील २१ जिल्ह्यांमध्ये आधीच अशी गोदामे बांधली आहेत आणि मुंबईतही असेच गोदाम उभारण्याचा प्रस्ताव आहे. सरकारने मिठागरांच्या जमिनीच्या या वापराबद्दल जनतेकडून सूचना आणि हरकती मागवल्या आहेत.