पुढारी ऑनलाईन डेस्क : अभिनेता सैफअली खानवर जीवेघेणा हल्ला करण्यात आला होता. या प्रकरणी अटक केलेल्या आरोपी मोहम्मद शरीफुल इस्लाम शहजादला २९ जानेवारीपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे. त्याला आज (दि.२४) मुंबईतील वांद्रे मॅजिस्ट्रेट कोर्टात हजर करण्यात आले होते. हल्लेखोर शरिफूलविरोधात अनेक पुरावे पोलिसांच्या हाती लागले आहेत. (Saif Ali Khan Attack Case)
यावेळी न्यायालयाने असे निरीक्षण नोंदवले की, या प्रकरणात लक्षणीय प्रगती झाली आहे आणि इतर परिणामकारक बाबींची चौकशी करणे आवश्यक आहे. हा गुन्हा गंभीर आहे आणि सत्र न्यायालयात खटला चालवता येईल. आरोपीची निर्दोषता निश्चित करण्यासाठी देखील अशी चौकशी आवश्यक आहे, त्यामुळे सर्व तथ्ये लक्षात घेता बीएनएसएस कलम ३५ अंतर्गत नोटीसशी संबंधित सादरीकरणे लागू होत नाहीत. रेकॉर्डवरून असे काहीही निष्कर्ष काढलेले नाही की अटक बेकायदेशीर आहे.
शहजादचे वकील संदीप शेरखाने म्हणाले की, पोलिसांनी तपासाचा अहवाल सादर केला. शस्त्र जप्त करण्यात आले आहे आणि कपडे देखील जप्त करण्यात आले आहेत. त्यांनी सर्व काही फॉरेन्सिक्सकडे पाठवले आहे. परंतु तपासाच्या दृष्टिकोनातून आज पोलिस कोठडी मिळवण्यासाठी पुरेसे कारण नव्हते. कारण मी आधीच मुद्दा उपस्थित केला आहे की, आरोपीची उपस्थिती आवश्यक नाही. कारण जेव्हा आरोपीला काहीतरी दाखवायचे असते. तेव्हा कोठडी आवश्यक असते. परंतु पोलिसांनी आधीच चर्चा केली आहे. प्रकरण इतके गाजले असल्याने न्यायालयाने ते विचारात घेतले आहे. आणि त्यांनी ५ दिवसांची पोलिस कोठडी दिली आहे.