

पुढारी ऑनलाईन डेस्क : बॉलीवूड अभिनेता सैफ अली खान (Saif Ali Khan) याच्यावर १६ जानेवारीरोजी पहाटे घरात घुसून जीवघेणा चाकू हल्ला करण्यात आला होता. यशस्वी शस्त्रक्रियेनंतर त्याला बुधवारी लीलावती रूग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. या पार्श्वभूमीवर त्याला मुंबई पोलिसांनी सुरक्षा दिली आहे. सैफ आणि त्याची पत्नी करीना कपूर यांच्यासोबत मुंबई पोलिसांचे तीन जवान सुरक्षेसाठी तैनात असणार आहेत. याआधी सैफला मुंबई पोलिसांची सुरक्षा नव्हती. तपासानंतर आणखी सुरक्षा वाढविण्याची शक्यता आहे.
सैफ अली खानवर जीवघेणा हल्ला झाल्यानंतर त्याला लीलावती रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्याच्यावर यशस्वी उपचार झाल्यानंतर आता त्याला रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाला आहे. पण, सैफला दुसऱ्या इमारतीत शिफ्ट करणार असल्याची माहिती समोर आली आहे.
सैफवर १५ जानेवारीला रात्री जवळपास अडीच वाजता चाकू हल्ला झाला होता. त्यानंतर त्याला तत्काळ रिक्षाने लीलावती रुग्णालयात पोहोचवण्यात आले होते. तिथे त्याच्यावर सर्जरी झाली. आता पाच दिवसांनंतर त्याला रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आले आहे. सैफ अली खानला लीलावती रुग्णालयातून घरी पोहोचण्यासाठी जवळपास १५ मिनिटे लागली. यावेळी तो रस्त्यावर उभे असलेलेया लोकांना हसून अभिवादन करताना दिसला.
जेव्हा तो घरी पोहोचला तेव्हा तो स्वत: कारमधून उतरून इमारतीच्या आत गेला. यावेळी सैफने व्हाईट शर्ट, निळी जीन्स, काळा गॉगलमध्ये दिसला. त्याच्या पाठीवर ड्रेसिंग केलेलं दिसलं.