पुढारी ऑनलाईन डेस्क : अभिनेता सैफ अली खान ( Saif Ali Khan ) याच्यावर चाकू हल्ला प्रकरणी दुर्ग रेल्वे पाेलिसांनी एका संशयिताला ताब्यात घेतले आहे. शालीमार ज्ञानेश्वरी एक्सप्रेसच्या जनरल डब्यातून रेल्वे पाेलिसांनी संशयित आराेपीला आज (दि. १८) दुपारी ताब्यात घेतले. ( Saif Ali Khan Stabbed Case ) काही वेळात मुंबई पोलीस छत्तीसगड येथील दुर्ग येथे पोहोचणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
दुर्गचे आरपीएफ प्रभारी संजीव सिन्हा यांनी सांगिलते की, आम्हाला मुंबई पोलिसांकडून माहिती दिली होती की, एक संशयित ज्ञानेश्वरी एक्सप्रेस ट्रेनने प्रवास करत आहे. त्यांनी त्याचा फोटो आणि टॉवर लोकेशन शेअर केले. त्या आधारावर, आम्ही जनरल डबा तपासला. यावेळी आरोपी सापडला. मुंबई पोलिस अधिकाऱ्यांशी व्हिडिओ कॉलद्वारे संपर्क साधण्यात आला आणि संशयिताची ओळख पटवण्यात आली आहे. त्याला ताब्यात घेण्यात आले आहे. संशयिताची पुढील चौकशी मुंबई पोलिसांकडून केली जाईल."
पोलिसांनी या प्रकरणात तपास करण्यासाठी ३५ पथक तयार केले हाेते. वेगवेगळ्या ठिकाणी त्यांच्याकडून तपास सुरु आहे. शनिवारी ( १८ जानेवारी) बांद्रा येथे हल्लेखोर रेल्वेस्टेशनजवळील एका सीसीटीव्हीमध्ये दिसून आला होता. हल्ला करुन पळून जाताना त्याने कपडे बदलले असल्याचे या फुटेजवरून स्पष्ट झाले हाेते. दादर येथे एका मोबाईलच्या दुकानात संशयित आरोपी हेडफोन खरेदी करत असल्याचेही सीसीटीव्ही फुटेजवरुन स्पष्ट झाले हाेते.
बॉलिवूड अभिनेता सैफ अली खान (Saif Ali Khan) याच्यावर वांद्रे (पश्चिम) येथील घरी पहाटेच्या सुमारास चाकू हल्ला झाला. यात तो गंभीर जखमी झाला. यामुळे त्याला तातडीने लीलावती रुग्णालयात दाखल करण्यात आले. पोलिसांनी सांगितले की, काल रात्री उशिरा एक अज्ञात व्यक्ती अभिनेता सैफ अली खान याच्या घरात घुसला आणि त्याच्या घरातील कर्मचाऱ्याशी वाद घातला. यादरम्यान सैफने मध्यस्थी करून त्या व्यक्तीला समजवण्याचा प्रयत्न केला. तेव्हा त्याने सैफ अली खानवर हल्ला करत त्याला जखमी केले. ही घटना पहाटे २ ते २.३० च्या दरम्यान घडली. ज्यावेळी ही घटना घडली त्यावेळी सैफच्या घरी त्याचे कुटुंबीय होते. सैफ अली खानला चाकूने ६ ठिकाणी भोसकल्याने त्याला गंभीर जखमी अवस्थेत रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.
सैफच्या घरातील सीसीटीव्ही फुटेज पोलिसांनी ताब्यात घेतले होते. या घटनेचा वांद्रे पोलिस, मुंबई गुन्हे शाखा तपास करत आहेत. पोलिस उपायुक्त दीक्षित गेडाम यांनी सध्या सुरु असलेल्या तपासाबाबत बोलताना सांगितले की, घरात घुसलेला हल्लेखोर सुरक्षा भेदून आता आला. सैफच्या फ्लॅटमध्ये हल्लेखोराने कसा प्रवेश केला? हल्लेखोराने चोरीचा प्रयत्न केला होता की त्याचा दुसरा काही हेतू होता? याचादेखील तपास केला जात आहे.
अभिनेता सैफ अली खानच्या प्रकृतीविषयी माहिती देताना लीलावती रुग्णालयाचे डॉ. नितीन डांगे यांनी सांगितले, "अज्ञात व्यक्तीने हल्ला केल्यानंतर सैफ अली खानला पहाटे २ वाजता रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्याच्या मणक्यात चाकू घुसल्याने त्याच्या पाठीच्या कण्याला मोठी दुखापत झाली. त्याच्या मणक्यात अडकलेल्या चाकू काढून टाकण्यासाठी शस्त्रक्रिया करण्यात आली. त्याच्या डाव्या हाताला आणखी दोन खोल जखमा झाल्या आहेत. त्याच्या मानेला एक जखम झाली असल्याने त्याच्यावर प्लास्टिक सर्जरी करण्यात आली. त्याची प्रकृती आता पूर्णपणे स्थिर आहे. तो आता बरा होत आहे आणि धोक्याबाहेर आहे."
"मला वाटते की मुंबई सर्वात सुरक्षित शहर आहे. कधीकधी काही घटना घडतात ज्या गांभीर्याने घेतल्या पाहिजेत. तथापि, या घटनेमुळे मुंबई असुरक्षित आहे असे म्हणणे चुकीचे ठरेल," अशा शब्दांमध्ये अभिनेता सैफ अली खान याच्यावर झालेल्या चाकूहल्ला प्रकरणी मुंबई असुरक्षित शहर झाले आहे, असा आरोप करणार्या विरोधी पक्षांच्या नेत्यांना मुख्यमंत्री देवेंद फडणवीस यांनी उत्तर दिले. अभिनेता सैफ अली खान यांच्यावर झालेल्या चाकू हल्लाबाबत पोलिसांनी माध्यमांना सर्व माहिती दिली आहे. हा हल्ला कोणत्या प्रकारचा आहे, यामागे नेमके काय आहे आणि हल्ल्यामागील हेतू काय होता हे सर्व तुमच्यासमोर आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले.