

पुढारी ऑनलाईन डेस्क : अभिनेता सैफ अली खान याच्यावर हल्ला झाल्यानंतर त्याने हॉस्पिटलला जाण्यासाठी एका प्रायव्हेट रिक्षाचा वापर केला होता. घरापासून ते हॉस्पिटलपर्यंतचा प्रवास केलेला रिक्षा चालक भजन सिंह याने सैफ अली खान याचे प्राण वाचवले. त्या रात्री नेमकं काय झालं, हे भजनसिंगने 'पुढारी न्यूज'शी बोलताना सांगितले.
सैफ अली खान याच्यावरती हल्ला झाल्यानंतर तो जवळपास 15 ते 20 मिनिटांनी बिल्डींग खाली आला आणि खाली येऊन थांबला असताना त्याला भजन सिंहने रिक्षात बसवून हॉस्पिटलला घेऊन गेला. यावेळी सैफ अली खान पूर्णपणे रक्तबंबाळ झाला होता. त्याच्या गळ्यावरती तसेच पाठीवरती वार होते. यावेळी सैफ अली खान याच्यासोबत तैमूर आणि त्यांचा एक मदतनीसदेखील होता. सैफ अली खान रिक्षामध्ये बसल्यावर ती व्यक्ती नक्की कोण आहे? याची कल्पना रिक्षा चालकाला नव्हती. तो थोडाफार प्रमाणात घाबरलेला होता. तरीसुद्धा त्याने मदत केली.
लीलावती हॉस्पिटलमध्ये उतरल्यानंतर रिक्षा चालकाला समजले की तो सैफ अली खान आहे. दरम्यान, सैफ अली खानला वाचवलं, हे माझं भाग्य आहे, असे यावेळी रिक्षाचालक यांनी सांगितले.
अभिनेता सैफ अली खान (Saif Ali Khan) याच्या प्रकृतीविषयी लीलावती रुग्णालयातील डॉक्टरांच्या पथकाने महत्त्वाची माहिती दिली. देवाच्या कृपेने सैफ अली खानची तब्येत आता व्यवस्थित आहे. त्याला आता कोणताही धोका नाही. सैफला आज आयसीयूतून स्पेशल रुममध्ये हलवण्यात आले आहे. पण पाठीवरील खोल जखमेमुळे त्याला बेड रेस्टची गरज आहे, असे लीलावती रुग्णालयाचे चीफ न्यूरोसर्जन डॉ. नितीन डांगे यांनी शुक्रवारी (दि.१७) पत्रकारांशी बोलताना सांगितले.
वांद्रे येथील ११ व्या मजल्यावरील आलिशान घरात गुरुवारी पहाटे घुसून एका अज्ञात हल्लेखोराने केलेल्या चाकूहल्ल्यात अभिनेता सैफ अली खान (Saif Ali Khan Attack News) गंभीर जखमी झाला होता. त्याच्यावर लीलावती रुग्णालयात सलग दोन मोठ्या शस्त्रक्रिया केल्यानंतर त्याच्या जीवाला आता कोणताही धोका नसल्याचे डॉक्टरांनी सांगितले. दरम्यान, हा चोरीचा प्रयत्न होता, असे खान कुटुंबीयांनी आणि पोलिसांनीही म्हटले असले; तरी सैफच्या घरात झालेल्या झटापटीतही या अज्ञात हल्लेखोराने सैफकडे एक कोटी रुपयांची खंडणी मागितल्याचे सांगितले जात असल्याने या चोरीच्या प्रयत्नाला आता खंडणीचे वळण लागले असून, या हल्ल्याने बॉलीवूडमध्ये एकच खळबळ उडाली.