

मुंबई : माझा मुलगा साहिलच्या मृत्युप्रकरणाचा तपास योग्य रितीने होत नसल्यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वत: लक्ष घालावे, अशी मागणी रवींद्र वाकोडे यांनी आझाद मैदानात २१ दिवसांपासून सुरू असलेल्या उपोषणस्थळी आयोजित पत्रकार परिषदेत केली.
आयआयटीच्या वसतीगृहात साहिलचा १८ सप्टेंबर २०२६ ला गळफासाने मृत्यू झाला. माझ्या मुलाच्या मृत्युला जबाबदार असणाऱ्यांना अटक करा, अशी मागणी त्यांनी यावेळी केली. त्यावेळी सहपोलीस आयुक्त (कायदा व सुव्यवस्था) मनोजकुमार शर्मा यांनी दोन दिवसांत संशयित आरोपींना अटक करतो, असे आश्वासन दिले. त्यानंतर साहिलचा मृतदेह ताब्यात घेतला. मात्र; अद्यापपर्यंत आरोपींना अटक झालेली नाही.
या प्रकरणाचा तपास करणारे गुन्हे शाखेचे अधिकारी आम्हाला तपासाची कोणतीही माहिती देत नाही. मुंबई पोलीस प्रशासनाकडे तपास अधिकारी बदला, अशी मागणी करतो आहे. पण; त्याकडे प्रशासन डोळेझाक करत आहेत. त्यामुळे या प्रकरणात मुख्यमंत्र्यांनी स्वत: लक्ष घालून आम्हाला न्याय द्यावा, असेही ते म्हणाले.