

मुंबई : विधानपरिषदेच्या उपसभापतिपदासाठी महाविकास आघाडीकडून जगन्नाथ अभ्यंकर यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतल्याने महायुतीचे सचिन अहिर यांची उपसभापतिपदी बुधवारी बिनविरोध निवड झाली. सचिन अहिर हे राजकारणातील अष्टपैलू नेतृत्व आहेत, अशा शब्दांत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांचे अभिनंदन केले.
सभापती राम शिंदे यांनी, या निवडणुकीसाठी महायुतीचे सचिन अहिर व महाविकास आघाडीचे (ठाकरे शिवसेना) जगन्नाथ अभ्यंकर यांचे अर्ज आल्याची माहिती दिली. संसदीय कार्यमंत्री चंद्रकांत पाटील यांनी उपसभापतिपदासाठी निवडणूक न घेण्याचा प्रघात आहे. त्यामुळे अभ्यंकर यांचा अर्ज मागे घ्यावा, अशी विनंती महाविकास आघाडीच्या नेत्यांना केली.
त्यावर, विधानपरिषदेच्या प्रथा-परंपरा आम्हाला माहीत आहेत. असे ठाकरे गटाचे अनिल परब यांनी सांगितले. अभ्यंकर यांचा अर्ज मागे घेतल्यानंतर सभापती राम शिंदे यांनी, सचिन अहिर यांची उपसभापतिपदी निवड झाल्याची घोषणा केली. त्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी सचिन अहिर यांना उपसभापतिपदाच्या खुर्चीवर आसनस्थ केले.
अहिर यांची निवड सहमतीने करून या उच्च सभागृहाची परंपरा कायम राखली आहे. विरोधी पक्षाचेही आपण आभार मानतो. अहिर आणि मी १९९९ मध्ये विधानसभेत निवडून आलो. त्यांच्याशी माझा जुना परिचय आहे. अहिर याचा अर्थ गोपालक; पण निर्भीड असा दुसराही अर्थ आहे. जे कोणाला घाबरत नाहीत त्यांना निर्भीड म्हणतात. ते निर्भीडपणे काम करणारे दिलखुलास नेते आहेत, अशा शब्दांत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांचे कौतुक केले.
माजी उपसभापती नीलम गोऱ्हे या संवेदनशील व्यक्तिमत्त्व आहेत. त्यांनी संघर्षाच्या काळात उत्तम भूमिका बजावली, अशा शब्दांत फडणवीस यांनी गोऱ्हे यांच्या कामाचे कौतुक केले.
सचिन अहिर यांचे नेतृत्वगुण ओळखून अजित पवार यांनी त्यांना राजकारणात चांगली संधी दिली. त्यांनी सगळ्या जबाबदाऱ्या समर्थपणे पार पाडल्या आहेत. उपसभापतिपदाची जबाबदारी ते उत्तमरीत्या सांभाळतील, असा विश्वास उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी व्यक्त केला.