Royal ! आप रॉयल फॅमिलीसे हो?

दिसणं संक्रमणातून येतं आणि वागणं संस्कारांतून!
Royal !
Royal !
Published on
Updated on

अनु-भवताल : ज्योती मुळ्ये

आप रॉयल फॅमिलीसे हो? प्रश्नासरशी मी पटकन मागे वळून पाहिलं. मी माझ्या आईसाठी नाजूक डिझाईनचं सुरेख चप्पल निवडत होते. त्या दुकानातला मुलगा शौनकला विचारत होता. नहीं! हम मिडलक्लास फॅमिली से हैं, कॉमन पीपल! लेकाने नम्रपणे खरं उत्तर दिलं. नहीं आप छुपा रहे हो... मैंने देखा है, आपके जैसे ही दिखते हैं रॉयल फॅमिली के लोग! तो भोळसट पोरगा चमकत्या नजरेनी लेकाकडे पाहत होता. आपल्या रुबाबदार देखणेपणाबद्दल कौतुकं झेलत मोठा झालेल्या लेकाच्या उत्तराकडे आता माझे कान टवकारले. आपने क्या देखा है मुझे पता नहीं है भैय्या, लेकीन जो आपसे अदब से मिले वो रॉयल फॅमिलीसे होता है, ना की जो दिखे!

मला लेकाकडून अगदी अशाच उत्तराची अपेक्षा होती. दिसणं संक्रमणातून येतं आणि वागणं संस्कारांतून! तुम्ही तुमच्या घरातून, जवळच्या माणसांकडून नेमकं काय उचललंय हे इथे समजतं. काय असतं ना, आपण नेहमीच आकर्षक गोष्टींना भुलतो. सगळेच! सौंदर्याचा मोह कुणाला नसतो? माणूस म्हटलं की, या ना त्या स्वरूपात सौंदर्याची आवड आलीच. जे जे उत्तम, उदात्त, उन्नत ते ते प्रिय होण्याचा माणसाचा स्वभाव. त्याला कोण अपवाद असणार? प्रत्येकाची सौंदर्यदृष्टी वेगळी, आवडनिवड वेगळी परंतु भावना एकच... रसिकत्वाची, आपलेपणाची, आवडीची!

हेच माणसांच्या बाबतीतही लागू होतं. प्रथमदर्शनी तरी माणसाचं दिसणंच छाप सोडून जातं. सुंदर दिसणारी वस्तू, व्यक्ती, पदार्थ, रचना, कलाकृती कुणालाही आवडतेच! आवडण्याच्या या मोहात त्यांच्या गुणधर्मांकडे आपलं किंचित दुर्लक्ष होतं, आपण करतोदेखील. माणसांच्या बाबतीत बोलायचं तर दिसणं हे बरंचस आनुवंशिक आणि स्वतःवर मेहनत घेऊन मिळवता येतं. स्वतःला प्रेझेंटेबल सादर करणं कुणाच्याही व्यक्तिमत्वाला चार चांद लावतं. पण केवळ दिसणं हे माणसाचं व्यक्तिमत्व नसतं. त्याच्यावर झालेले, त्याने स्वीकारलेले संस्कार, विचार, संवाद कौशल्य, जाणीव अशा बर्‍याच गुणांमधून व्यक्तिमत्व घडतं. जेव्हा पिढ्यान्पिढ्या उत्तम विचारांचा, मूल्यांचा, उदात्त वर्तणुकीचा, मायेचा, आपुलकीचा, माणुसकीचा वारसा जपला जातो तेव्हा रॉयल व्यक्तिमत्व घडतात.

भरमसाट संपत्ती बाळगणार्‍या व्यक्तीचं राहणीमान भपकेबाज, छाप पाडणारं, क्षणिक भुलवणारं असू शकेल; परंतु ती स्वभावाने, वृत्तीने, वागण्याने रॉयल असेलच असं नाही. अशा व्यक्तीला, कुटुंबाला फारतर गर्भश्रीमंत म्हणता येईल. सौजन्य, सौहार्द, अनुकंपा, विनयशीलता हे गुणविशेष संपत्तीच्या जोरावर नाही कमावता येत. ते रक्तात असावे लागतात. त्यामुळे श्रीमंत दिसणं वेगळं आणि रॉयल असणं वेगळं! रॉयल दिसणं याचा अर्थ केवळ राजेशाही तामझाम असा नव्हे, तर राजाला शोभेल असं. म्हणजे सभ्य, परोपकारी, सर्वोत्तम, उदात्त, उदार, मोकळ्या मनाचं, विशाल हृदयी, सर्वसमावेशक, कनवाळू, दयाळू... इतक्या व्यापक अर्थाच्या जवळपास पोहोचणार्‍या गोष्टी आणि व्यक्तींनाच फक्त रॉयल म्हणवण्याचा अधिकार आहे. शेवटी दिसणं देवाने दिलंय, वागणं आपल्या हातात असतं. रॉयल म्हणतानाचे चार गुण जरी आत्मसात केले तरी आपली वाटचाल चांगुलपणाच्या दिशेने होतेय म्हणायचं. कौतुकाचं काय, लोक सहृदय असतात त्यामुळे मोकळेपणाने करतात. आपण फक्त त्याला पात्र बनायचा प्रयत्न करत राहायचं.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news