मुंबई : मुंबई महानगरामध्ये सार्वजनिक वाहने म्हणजेच टॅक्सी, रिक्षा, खासगी प्रवासी वाहने तसेच अॅप आधारित सार्वजनिक वाहनांच्या माध्यमातून प्रवास करणार्या नागरिकांची संख्या मोठी आहे. त्यांना हा प्रवास करताना अनेक अडचणींचा सामना करावालागत असल्याने ही अडचण दूर करण्यासाठी मुंबईच्या प्रादेशिक परिवहन कार्यालयाकडून टोल फ्री क्रमांक सुरू करण्यात आला आहे. टोल फ्री क्रमांकावर प्रवाशांना तक्रार करता येणार आहे.
प्रवाशांना भाडे नाकारणे, प्रवाशांशी उध्दट वर्तन-गैरवर्तन करणे, अधिकचे भाडे आकारणे, सार्वजनिक वाहनात प्रवाशांकडून वस्तू विसरल्यास त्या परत न करणे, प्रवाशांना लांबच्या रस्त्याने इच्छित स्थळी पोहचविणे, वाहनाच्या क्षमतेपेक्षा अधिकचे प्रवासी बसविणे, नादुरुस्त वाहन रस्त्यावर चालविणे या प्रमुख अडचणींचा प्रवाशांना नेहमीच सामना करावा लागतो.
रिक्षा, टॅक्सी तसेच अॅप आधारित ओला, उबेर इत्यादी वाहनांच्या चालकांविरुध्द प्रवाशांना भाडे नाकारणे, गैरवर्तन, अतिरिक्त भाडे आकारणे, अशा प्रकारच्या तक्रारी करीता प्रवाशांना तक्रारीचे निरसन करता यावे, बेशिस्त चालकाविरुध्द कारवाई करता यावी याकरीता संपूर्ण मुंबई महानगर क्षेत्र विकास प्राधिकरणासाठी 1800-220-110 हा टोल फ्री क्रमांक सुरु करण्यात आला आहे. 24 तास हा टोल फ्री क्रमांक प्रवाशांसाठी उपलब्ध आहे. त्यामुळे या क्रमांकावर संपर्क करुन तुम्ही तक्रार करु शकता, असे आवाहन परिवहन विभागानें केले आहे.